महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवशक 352 या तिथीनुसार साजरा केला जाणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आठ जून ते नऊ जून या कालावधीत संपन्न होत आहे. शासनाने हा कार्यक्रम शासकीय इतमामात करण्याची घोषणा केली असून त्यासाठी सोमवारी (9 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांसह उपस्थित राहतील, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
हा सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वदिनी शिरकाई देवीच्या पूजनापासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून शिवभक्तीच्या जागरात संपूर्ण रायगड दुमदुमून गेल्याचे चित्र दिसत आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड व कोकणकडा मित्र मंडळ रायगड यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पूर्वसंध्येला झालेल्या ‘ही रात्र शाहिरांची’ या कार्यक्रमाने उपस्थित शिवभक्तांची मने जिंकत रायगडावर जणू शिवकाळ अवतरला होता.