शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दुरवस्था  pudhari photo
रायगड

Heritage rain gauge damaged : शिवकालीन पर्जन्यमापक यंत्राची दुरवस्था

किल्ले रायगडवरील यंत्र संवर्धनासाठी पुरातत्वने लक्ष देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्‍या किल्ले रायगडावरील अनेक राजवाड्यांच्या झालेल्या स्थितीप्रमाणेच या ठिकाणी असलेले शिवकालीन दगडी बांधकाम असलेले पर्जन्यमापक यंत्र देखील आता दुरवस्थेमध्ये जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गडावर सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामामध्ये केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या महत्त्वपूर्ण असणार्‍या पर्जन्यमापक यंत्राची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच छत्रपतींच्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आला होता यामध्ये रायगड किल्ल्याचा समावेश झाल्याने शिवप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या असून रायगडावरील अनेक वास्तु प्रकाशझोतात येण्यास मदत होणार आहे.

आज आधुनिक पद्धतीची यंत्रणा वापरून पर्जन्यमापन केले जाते आणि पावसाचा अंदाज बांधला जातो. परंतु शिवकाळात आणि त्यापूर्वी देखील पारंपारिक पद्धतीने पर्जन्यमापन केले जात असल्याचे इतिहासातून समोर आले आहे. किल्ले रायगडावर देखील अशा प्रकारे शिवकालीन पर्जन्यमापक अस्तित्वात आहे. परंतु त्याची दुरवस्था होत आहे.

या पर्जन्यमापकाची सद्या दुरवस्था झाली आहे. नव्या अभ्यासातून हे पर्जन्यमापक असल्याचे समोर आले आहे. शेतीच्या पीकपाण्याचे नियोजन करण्यासाठी त्या काळात हे अतिशय सुंदर असे दगडी पर्जन्यमापक रायगडावर बसविण्यात आले असावे असा अंदाज बांधला जातोय. हे पर्जन्यमापक आहे हे रायगड पाहण्यासाठी आलेले पर्यटक, इतिहासाचे अभ्यासक दुर्गप्रेमी मंडळींना माहीत नव्हते.

रायगड अभ्यासक व संशोधक गोपाळ चांदोरकर यांच्या ते दृष्टीस पडले. त्यांनी आपल्या ’वैभव रायगडचे’ या पुस्तकात या पर्जन्यमापकाचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह उलगडून दाखविले आहे. वैभव रायगडाचे मध्ये याचा प्रथम उल्लेख केला आहे.तथ श्रीमत् रायगिरौ या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगडावर पाणी नियोजन उत्तम केले होते. गडावर गंगासागर, हत्तीतलाव, कुशावर्त तलाव, आणि इतर अनेक बंधारे बांधून पाणी नियोजन केले होते.

आता रायगड संवर्धनाच्या माध्यमातून या तलावांचे योग्य प्रकारे संवर्धन केले जात आहे .वर्षाला सरासरी किती पाउस पडतो हे पर्जन्यमापकामुळे समजून येते आणि रायगडावर किती तलाव लागतील, त्यांची खोली किती ठेवायची, पाणी किती पुरेल याचा अंदाज घेतला जात होता. त्या काळात देखील शेती हे उदरनिर्वाह करण्याचे साधन होते.

राज्याचा कोष देखील शेती उत्पन्नावर अवलंबून होता. त्यामुळे पीकपाण्याचे नियोजन या पर्जन्यमापक यंत्रणेच्या माध्यमातून केले जात होते. याकरिता हे पर्जन्यमापक बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. दुरवस्था झालेल्या या पर्जन्यबाबत यंत्राचे संवर्धन करून ही वास्तू जतन केली जावी अशी पर्यटक व शिवप्रेमींची मागणी आहे.

असे आहे पर्जन्यमापक

किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम दगडात बनवलेले पर्जन्यमापक यंत्र कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे बांधून घेतले. हे पर्जन्यमापक दगडी बांधकामातील असून याच्या तीन बाजू भिंतीच्या आहेत तर एक बाजूने पाण्याचा मार्ग दिसून येतो. वरील बाजूस तीन छिद्र ठेवण्यात आले आहेत. या छिद्रातूनच पावसाचे पाणी आत जाऊन पारंपारिक पद्धतीने पावसाचे मोजमाप केले जात होते.

किल्ले रायगडला आता जागतिक वारसा स्थळ म्हणून लौकिक प्राप्त झालेला आहे. त्यामुळे गडावरील सर्व ऐतिहासिक वास्तूंबरोबरच या पर्जन्यमापक यंत्राची देखील तातडीने केंद्रीय पुरातत विभागामार्फत दुरुस्ती केली जावी.
नितीन पावले, माजी उपनगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT