रायगड

Vayoshri Yojana Raigad | रायगडातील ज्येष्ठांना वयोश्री योजनेचा मिळणार आधार, किती हवे वय?

पुढारी वृत्तसेवा
रायगड ः किशोर सुद

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना‘ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनेचा प्रचार आणि प्रसार जिल्हयाच्या ग्रामीण भागात अद्याप झालेला नाही. या शिवाय ग्राम पातळीवर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा नसल्याने जिल्हयात सुमारे 3 लाख 50 हजार ज्येष्ठ नागरिक असतानाही आतापर्यंत फक्त 1262 ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचे अर्ज भरले आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ग्रामपातळीवर यंत्रणा राबविण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना‘ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने निर्गमित केला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2 लाख आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपर्‍यात पसरलेले आहे. असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण (पॉप्युलेशन बेस्ड स्क्रिनिंग) व ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘ अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी/केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरीता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात वयोश्री योजनेच्या लाभार्थींचे अर्जांची संख्या अत्यल्प आहे. समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद व संबंधित विभागांनी एक कार्यक्रम तयार करून ग्रामपातळीवर वयोश्री योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज भरून घ्यावेत. यात दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. उदय सामंत, पालकमंत्री, रायगड
रायगड जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख ज्येष्ठ नागरिक असताना जिल्ह्यात फक्त 1200 अर्ज या योजनेत भरले गेले आहेत. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील ज्येष्ट नागरिक पंचायत समितीपर्यंत कसा पोहोचणार? त्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश द्यावेत.
-खा. सुनील तटकरे, रायगड
योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा नाही. ग्रामसेवकांकडून या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे शासनाचे निर्देश असते तर योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी झाली असती.
- सुनील जाधव, सहायक आयुक्त, समाजकल्याण, रायगड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT