रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: सावित्री नदीला पूर आल्यानंतर तात्काळ रावढळ येथील पुलासह पुलाच्या दोन्ही बाजूच्या परिसरात रस्त्यावर पाणी चढते त्यामुळे खाडीपट्टयातील सर्व गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटतो. तत्काळ पोलीस कर्मचारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करतात. हा प्रश्न गेली अनेक वर्षे भेडसावत असून या प्रश्नावर अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.
गेली 2017 साली मंजूर झालेल्या याच मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये रावढळ पुलाचे काम देखील नव्याने होत आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू असून पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे खाडीपट्टयातील नागरिकांना पुराशी सामना करावा लागणार आहे.
सन 2017 पासून राजेवाडी फाटा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबडवे इथपर्यंतच्या 56 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र आजतागायत हे काम पूर्णत्वाला गेलेले नाही. या महामार्गावर मोऱ्या, पूल आणि कित्येक ठिकाणी रस्त्याचे काम आजही अपूर्ण आहे.
या कामाची स्थिती संथ गतीने सुरू असून त्यामुळे 2019 साली पूर्ण होणारे हे काम आज देखील अपूर्ण अवस्थेत आहे. सुरू असलेल्या कामामध्ये अनेक अपघात या ठिकाणी घडले असून अपघातदरम्यान अनेकजण जखमी झाले आहेत. महामार्गाच्या कामामुळे येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन पदरी रस्त्याच्या कामामध्ये सदर मार्गावरील मुख्य असलेल्या रावढळ पुलाचे काम तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता पाहायला मिळत असून पुलाच्या कामासंदर्भात कोणीही लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही किंवा महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून त्यामध्ये देखील पारदर्शकता आढळून येत नसल्याने त्याबद्दल देखील येथील स्थानिक लोकप्रतिनिधी मूग गिळून शांत बसले आहेत.
रावढल पुलाचे काम तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते, जेणेकरून सावित्री नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी रावढळ पुलावर चढले नसते आणि त्याचा येथील स्थानिक लोकांना फायदा झाला असता.
रावढळ पूल हे 2023 च्या पुरामध्ये पुराच्या पाण्यात कित्येक तास लुप्त होते. पुलावरील संरक्षण कठडा पूर्णपणे जीर्ण झाला असून मोडकळीस आल्यात जमा आहे. पुलाची उंची देखील कमी असल्याने पुराच्या पाण्यामध्ये पुलाला मोठा पाण्याचा वेढा पडतो आणि तात्काळ पोलीस प्रशासनाकडून खाडीपट्टयात येणारा मार्ग पुलाच्या दरम्यान वाहतुकीस बंद ठेवण्यात येतो त्यामुळे यावर्षी रावढळ फुलाचे नवीन बांधकाम करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र पुलाच्या कामाची स्थिती अतिशय संथ गतीने असल्याने पावसाळ्यापूर्वी हा पुल होण्याची शक्यता आता धुसर झाली आहे.
पुलाच्या कामाबाबत आवाज उठवणे गरजेचे
महाडच्या खाडीपट्ट्यातील ही समस्या असून सुदैवाने राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन दोन पदरी महामार्गाच्या कामामध्ये सदर पुलाची उंची वाढवून हा पूल नव्याने होणार आहे. मात्र या पुलाच्या कामामध्ये होणारा विलंब पाहता लोकप्रतिनिधिंनी या संदर्भात आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून खाडीपट्टयाचा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल आणि संभाव्य पुराच्या धोक्याने नागरिक सावित्री नदीला पूर आल्यानंतर देखील वाहतूक देखील सुरळीत चालू राहिल. तरी लोकप्रतिनिधिंनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
रावढळ पुलाचे काम पावसाळ्यापर्यंत होणे शक्य नाही, पावसाळ्यानंतर काम होईल. ठेकेदाराकडे लेबर नसल्यामुळे हे काम थांबले आहे. संबंधित ठेकेदाराला सुपरवायझर यांनी नोटीस बजावली आहे.- अभिजित झेंडे, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उप-विभाग, महाड