माऊली pudhari photo
रायगड

माऊली

जीव-शीवाचं मीलन फक्त मानवी जन्मातच घडते ॥

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा जाधव (मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई)

सत्वगुण कर्मे आणि त्या सहवासांतून होणारी त्याची विवेकाकडील वाटचाल, विवेकाच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान, ज्ञानाच्या स्पर्शातून निर्माण होणारे ‘वैराग्य’ आणि ‘अहंकार’, वैराग्यापासून प्राप्त होणारे ‘धैर्य, संयम; हे सद्गुुण. त्याचसोबत अहंकारामधून निर्माण होणारे साधन मार्गातील अडथळे. याच अडथळ्यांना पार करण्यासाठी सोबत ठेवावयाची गुणसंयमरूपी शस्त्रास्त्रे, यांचा करावयाचा वापर याविषयी गत लेखात आपण चिंतन केले आहे. अक्षयवृक्षाला सत्वगुणसंपन्न साधकाच्या साधनेमधून जो फळभार (पुण्याचा) येतो. त्या फळभाराने अक्षयवृक्षाच्या फांद्या पुन्हा वाकून मुळाशी स्पर्श करतात यावरच अधिक चिंतन आजच्या लेखात...!!!

॥ श्री ॥

अक्षयवृक्षाचं संसारस्वरूप ‘रूपक’ इतके सहजतेने नटवलेलं आहे की, ज्यामधून अखंड संसार, ब्रह्मांड डोळ्यासमोर उभ राहावं. विश्वाचा डोलारा कवेत यावा आणि त्याच्या ज्ञानानं ‘जीव’ हा जीवनमुक्त व्हावा. रज-तम-सत्व गुणकार्याचे रूपांतर कर्मफळात होते. कर्मफळातून निर्माण होणारे ‘पाप-पुण्य’ पाप आणि पुण्यायीने निर्माण होणारी सुख-दुःखे. सुख-दु:खांच्या उपभोगातून कमी होणारी कर्मफळ राशी यांचा आपण गतलेखांतून अभ्यास केला. रज आणि सत्व या दोन गुणांच्या माध्यमातून धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चार पुरुषार्थांना साध्य करता येते. ‘रज’ कर्माच्या माध्यमातून ‘अर्थ-काम’ साध्य करता येते.

‘अर्थ-काम’ यांना ‘तमाची’ जोड मिळाली तर जीवनाचा प्रवास अधःपतनाकडे तर ‘अर्थ-काम’ यांना ‘सत्वाची’ जोड मिळाली तर जीवन प्रवास उत्कर्षाकडे. ‘धर्म आणि मोक्ष’ या दोन पुरुषार्थांना ‘सत्वगुणांनी’ धारण करता येते. थोडक्यात चार पुरुषार्थांना साध्य करण्यासाठी रज-सत्वाचा महत्त्वाचा वाटा, त्यांच्या माध्यमातून या जीवनाचा आनंद लुटला पाहिजे. रज-सत्व गुणांच्या संपर्कात राहून स्वतःच जीवन चांगल्या कर्मानं बहरलं की त्याला पुण्याची एवढी फळ लगडतात, की त्यांच्या भारानं जीवनवृक्षाची फांदी त्याच्याच बुंध्याला ऐकते. हा ‘बुंधा’ किंवा ‘मूळ’ म्हणजेच ‘ब्रह्म’ होय.

ज्ञानवृद्धीनं ब्रह्मत्वाचा साक्षात्कार होतो. हा साक्षात्कार ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलो त्या ‘संसाराच्या’ माध्यमातून होतो. हा संसार म्हणजे ‘माया’. मायेनं लुब्ध असलेल्या, व्यापलेल्या या जीवनात आपल्याला ‘ब्रह्म’ साक्षात्कार होणे हे सहज साध्य नाही पण ते दुर्लभही नाही. याच परब्रह्म साक्षात्काराला ‘मायाविशिष्ट ब्रह्म’ असेही म्हणतात. मायाविशिष्ट ब्रह्म हे मायावी जगात पाहायला मिळण्याचे भाग्य हे मानवदेहातच आहे.

माया ही शाश्वत नाही तर ती नश्वर आहे. असं असतानाही तीच्या सान्निध्यात राहून परब्रह्म हाती येणं किती आनंददायी असेल, नाही का? अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या अगाध-अनंत अशा सत्कार्यरूपी कर्मफळांनी लगडावयाच्या असतील तर उठा, सावध होवोन सत्कर्मवसा घ्या. आपआपल्या परीनं पण निश्चयानं एक-एक सत्कर्म करायला सुरुवात करा. ध्येय फक्त सत्कर्म हेच ठेवा. दुष्कर्मापासून सावध राहत स्वतःचाच बचाव करा. त्याच माध्यमातून तुम्हा-आम्हाला जीवनाचं अंतिम ध्येय गाठता येणार आहे. पुण्यफळाने लगडलेल्या जीवाचं माऊली फार सुंदर वर्णन करतात.

म्हणोनि ब्रम्हेशानापरौंते। वाढणे नाही जीवाते।

तेथुनि मग वरौतें । ब्रम्हचि की ॥

‘ब्रह्मेशान’ म्हणजे ब्रह्मलोक आणि शिवलोक याची प्राप्ती होणे म्हणजे जीवा-शिवाचे मीलन होणे. सत्कर्मानेच जीवा-शिवाचं मीलन होऊ शकते, हे विधीचं विधान आहे. आपल्या पूर्वजांनी तुमच्या माझ्या जीवनांचा उद्धार होण्यासाठी किती बारकाईने अभ्यास केला आहे. स्वतः जीवनमुक्त होण्यासाठी जे खडतर परिश्रम केले, त्यातून त्यांनी जीवनमूल्यांची आणि नीती शास्त्रांची अभिजात मांडणी केली; ती फक्त तुमच्या आणि आमच्यासाठीच. मानवी जन्म आपणास अनेक जन्मांच्या साधनेनं मिळालेला आहे. त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी तत्त्वज्ञान, अध्यात्माचे महामार्ग त्यांनी निर्माण करून ठेवले आहेत. सन्मार्गाने चालण्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यांचा स्वीकार करण्यासाठी प्रयत्नपूर्वक आम्हाला तयार व्हावे लागेल.

रज-सत्व गुणांच्या वर्तन प्रक्रियेतून प्राप्त होणारे स्थान, त्यावरती फक्त ब्रह्म आहे. त्यानंतर पुढे फक्त आणि जीवाला ‘मुक्ती’ आणि ‘शांती’ पाहायला मिळेल. ब्रह्मप्राप्ती होताक्षणी ‘संसार’ आणि ‘माया’ यामधून जीवाची नुसती सुटका होत नाही, तर ही ‘माया’ मुळासकट नाहीशी होते. ही अनुभूती खरोखरच धक्कातंत्रासारखी समोर येते. अध्यात्मातील ही अशी एक ‘वेळ’ असते, जीथे जे पहिलं अस्तित्वात आहे, असे समजले होते, ते मुळात नव्हतच हे प्रत्ययास येते. हा देह, हा परिसर, हे सगेसोयरे, हे मायबाप, हे राष्ट्र, हा धर्म, हे जग, हे विश्व या सर्वांचा असलेला स्वीकार या आध्यात्मिक अवस्थेवर येताक्षणी एकाच क्षणात ‘तुटतो.’ हा सर्व जगत् व्यवहार मिथ्या होता हे प्रत्ययात येणे याविषयी संत ज्ञानोबारायांचा एक अभंग मला स्मरतो -

कोणाचे हें रूप, देह हा कोणाचा । आत्माराम साचा सर्व जाणे।

मीतूं हा विचार विवेकें शोधावा । गोविंद हा घ्यावा याच देही॥

रामकृष्णहरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT