मागील एक ते दीड महिन्यांपासून पावसाला सुरुवात झाली असून आता या पावसाच्या पाण्यामुळे पेण तालुक्यातील हेटवणे, शहापाडा आणि आंबेघर ती तीनही धरणे भरली आहेत. यातील शहापाडा धरण ओव्हरफ्लो झाला असून हेटवणे आणि आंबेघर धरणांची पातळी वाढली आहे.
ही पातळी वाढली असली तरी पेण तालुक्यातील आजूबाजूच्या गावांना सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. याउलट आजमितीला पेण तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. पेण तालुक्यातील शहापाडा धरण ओव्हरफ्लो वाहू लागल्याने याठिकाणी धरणाच्या पायथ्याशी पावसाचा आणि धरणाच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करत आहेत.
तालुक्यातील तीनही धरणांचा विचार करता या तालुक्यात एवढी मोठी धरणे असून देखील येथील खारेपाट भागात उन्हाळ्याच्या हंगामात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झालेले असते. पैकी आंबेघर धरण हे असे धरण आहे की त्याचे पाणी कोणत्याही कारणासाठी वापरत आणले जात नाही. पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या धरणाचे पाणी असेच वाया जाते.या पाण्याचा कुठेतरी वापर करण्यासाठी तजवीज करावी असा विचार प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून केला जात नाही.
हेटवणे धरणाची 144.98 मिलिमीटर क्युबिक एवढी क्षमता असून आजमितीला या धरणात 80.65 मीटर एवढा पाणीसाठा झाला आहे, तर शहापाडा धरण हे ओव्हरफ्लो होऊन भरत आहे. मात्र सध्याच्या पडणार्या पावसामुळे पेण तालुक्यातील नदीकाठच्या कोणत्याही भागाला धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता सध्या तरी धरणांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. जर तशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर प्रशासनाकडून नदीकाठच्या ग्राम पंचायतींना तशी पूर्वसूचना दिली जाते आणि अती धोका असेल तर एक प्लॅन तयार करून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येते, मात्र सध्या ती स्थिती निर्माण झालेली नाही.प्रवीण पवार, प्रांताधिकारी, पेण