रायगड : शरद निकुंभ
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीचे ऐतिहासिक वैभव असलेल्या सरसगड किल्ल्याला पुन्हा एकदा वणव्याचा विळखा पडला आहे. किल्ल्याच्या डोंगररांगांवर लागलेल्या भीषण आगीने मोठ्या परिसरातील वनसंपदा जळून खाक होत असून पशू-पक्ष्यांच्या अधि-वासालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. आगीचे रौद्ररूप आणि वेगाने पसरणाऱ्या ज्वाळा पाहता स्थानिक दुर्गप्रेमी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि आवश्यक साधनसा मग्रीच्या अभावामुळे बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले.
सरसगडाच्या डोंगरावर वणवा लागल्याची माहिती मिळताच दुर्गप्रेमी केतन म्हसके, दत्तात्रय सावंत, नयन केदारी आणि चैतन्य पांडव यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाचे वनरक्षक अविनाश पाटील तसेच कर्मचारी पांडुरंग पवार आणि नामदेव पुंजारे यांनीही प्रत्यक्ष गडावर जाऊन आग विझविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. मात्र, वणव्याचा विस्तार मोठा असल्याने तळईच्या बाजूकडील परिसरात रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती.
सरसगडाचा तीव्र उतार, घनदाट झाडी-झुडपे, आगीमुळे निर्माण होणारा धूर, तसेच परिसरातील कुयलीचा त्रास यामुळे आग विझविणे अत्यंत जिकिरीचे ठरत होते. डोंगरावरील दुर्गम भागात अग्निशमन वाहन पोहोचणे शक्य नसल्याने उपलब्ध मनुष्यबळ आणि पारंपरिक साधनांच्या मदतीने आग रोखण्याचे प्रयत्न करावे लागले. आधुनिक अग्रिशमन उपकरणे, पुरेशी साधनसामग्री आणि विशेष प्रशिक्षित पथक उपलब्ध नसल्याने बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमींकडून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि गडाच्या परिसराची स्वच्छता अशी विविध कामे केली जात आहेत. अनेक वर्षांच्या परि-श्रमातून वाढविलेली झाडे, झुडपे आणि नैसर्गिक वनसंपदा या वणव्यामुळे काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. या आगीत लहान वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटी आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याची भीती आहे.
या आगीमुळे केवळ हिरवाईच नष्ट होत नसून सरसगडाच्या ऐतिहासिक वास्तू, तटबंदी आणि इतर पुरातन अवशेषांनाही उष्णतेमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या घटनेकडे केवळ वणव्याची घटना म्हणून न पाहता ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचा गंभीर प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे, असे दुर्गप्रेमी केतन म्हसके यांनी सांगितले.
सरसगडावर वारंवार वणवे लागण्याच्या घटना घडत असल्याने या आगी नैसर्गिक कारणांमुळे लागतात की काही समाजकंटकांकडून जाणीव पूर्वक लावल्या जातात, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. दोर्षीना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालीतील नागरिक आणि शिवप्रेमीं-मधून होत आहे.
किल्ल्याच्या संवेदनशील भागात अग्निरोधक उपाययोजना करणे, आवश्यक ठिकाणी फायर लाईन तयार करणे, आग विझविण्यासाठी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देणे, स्थानिक स्वयंसेवकांचे प्रशिक्षित पथक तयार करणे आणि उन्हाळ्याच्या कालावधीत नियमित गस्त वाढविणे आवश्यक आहे.
निसर्गाचा अमूल्य ठेवा जपणार कोण?
सरसगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून पालीच्या परिसरातील पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण आधार आहे. येथील वृक्षसंपदा, पक्षी, वन्यजीव आणि जैवविविधता यांचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. दरवर्षी वणव्यांमध्ये गडाची हिरवाई भस्मसात होत असेल, तर वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना अर्थ उरणार नाही. त्यामुळे वणवा रोखण्यासाठी केवळ आग लागल्यानंतर धावपळ न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.