महाड, पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी नजीक कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पूर्वी शासनाने हटवावी, अशी मागणी रायगड प्राधिकरण चे अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासंदर्भात भारतीय पुरातत्त्व विभागाने देखील समाधी संरचना व ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावे उपलब्ध नाही. समस्त भारतवासी यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्रा समाधी 31 मे 2025 पूर्वी कायमस्वरूपी हटवावी, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे.
किल्ले रायगडपासून पाच किलोमीटरचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावा, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र शासनाकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच रायगड प्राधिकरण चा सुरू असलेला कारभार हा अधिक पारदर्शक करावा, विकासात्मक कामाबाबत स्थानिक शिवभक्तांच्या मतांचा विचार करावा, असेही या पत्रामध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, सुमारे 12 ते 15 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काही अज्ञात व्यक्तींनी तोडून दरीमध्ये फेकून दिली होती. त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाने या समाधीची पुनर्बांधणी केली आहे. या ठिकाणी चार सशस्त्र पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चार पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची आठ दिवसांसाठी नियुक्ती करण्यात येते. त्यानंतर नवीन अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी हजर राहतात, अशी माहिती स्थानिक पोलीस विभागाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, महाडमधील कोकणकडा मित्र मंडळाने या संदर्भात शासनाला किल्ले रायगड परिसरात कायदा व सुव्यवस्था स्थिती कायम राहावी, या उद्देशाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी स्वातंत्र्यपूर्व काळात शिवसमाधीची निर्मिती झाली. तेव्हापासून असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.