सह्याद्रीच्या पर्वतराजीत पुन्हा जीवसृष्टी बहरली; पश्चिम घाटाचे वैभव बहाल  pudhari photo
रायगड

Sahyadri biodiversity revival : सह्याद्रीच्या पर्वतराजीत पुन्हा जीवसृष्टी बहरली; पश्चिम घाटाचे वैभव बहाल

15 वर्षांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश; सकारात्मक बदल महाराष्ट्राबरोबर जगासाठी आशादायी उदाहरण

पुढारी वृत्तसेवा
रायगड : जयंत धुळप

एकेकाळी मानवी हस्तक्षेप आणि पर्यावरणाच्या र्‍हासामुळे धोक्यात आलेला सह्याद्रीच्या पर्वतराजीतील पश्चिम घाट आता पुन्हा एकदा आपल्या नैसर्गिक वैभवाने नटला आहे. गेल्या 15 वर्षांपासून शासन, वन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. जागतिक वारसास्थळ आणि जैवविविधतेचे केंद्र असलेल्या पश्चिम घाटातील हे सकारात्मक बदल केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक आशादायक उदाहरण ठरले आहेत.

सुमारे दोन दशकांपूर्वी प्रदूषण, बेसुमार जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे पश्चिम घाटातील परिसंस्थेवर गंभीर परिणाम झाला होता. या धोक्याची जाणीव ठेवून, संयुक्त राष्ट्रांनी 2010 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष’ म्हणून घोषित केले आणि तेव्हापासून संवर्धनाच्या चळवळीला मोठी गती मिळाली. या चळवळीतून झालेली जनजागृती आता फळाला आली आहे. पश्चिम घाटामध्ये 1,500 दुर्मीळ प्रजाती, तर 12 हजार वैविध्यपूर्ण प्रजाती आढळल्याने हा घाट जागतिक हॉटस्पॉट झाला असून, येथे दुर्मीळ फुलपाखरे, पट्टेरी वाघ, हत्ती, सांबर, खवले मांजर, अशी प्राणिसंपदाही पाहायला मिळत आहे.

जागतिकस्तरावर विविध देशांतील एकूण 34 जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्रातील सह्यादी पर्वतराजीतील पश्चिम घाटातील जैवविविधता अतिउच्च दर्जाचे जैवविविधता क्षेत्र मानले जाते. गेल्या 20 वर्षांपूर्वी पश्चिम घाटातील या जैवविविधतेला प्रदूषणापासून ते जंगलतोडीपर्यंतचे विविध धोके निर्माण झाले होते. मात्र, गेल्या 15 ते 20 वर्षांत जंगल, जैवविविधता आणि त्यांचा मानववंशाच्या अस्तित्वासाठी असलेला अनन्यसाधारण संबंध, याबाबत शासन, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून झालेली जनजागृती आणि जंगल व जैवविविधता संरक्षणासह संवर्धनासाठीचे यशस्वी प्रयत्न, यामुळे पश्चिम घाट क्षेत्रातील जैवविविधता समृद्धी ही लक्षणीयच नव्हे, तर जागतिक पातळीवर दखलपात्र ठरली आहे.

पश्चिम घाटातील वनस्पतींमध्ये एककोशिकीय सायनोबॅक्टेरियापासून अँजिओस्पर्म्सपर्यंत सुमारे 12,000 प्रजाती आहेत. या स्पेक्ट्रममध्ये फुलांच्या वनस्पती भारतीय वनस्पतींपैकी सुमारे 27 टक्के आहेत, ज्यामध्ये 4,000 प्रजाती आहेत, ज्यापैकी सुमारे 1,500 प्रजाती स्थानिक आहेत. द्वीपकल्पीय भारतातील बहुतेक स्थानिक वनस्पती पॅलिओएंडेमिक आहेत, ज्यांना पश्चिम आणि पूर्व घाटांच्या दोन्ही बाजूंच्या टेकड्यांमध्ये अनुकूल पर्यावरणीय कोनाडे आढळले आहेत.

स्थानिक प्रजातींच्या वितरणाचा विचार करता पश्चिम घाटातील पर्यावरणीय कोनाडे बेटांसारखे दिसतात. यापैकी अनेक प्रजाती औषधांचा पारंपरिक स्रोत आहेत. भारतातील बहुतेक औषधी वनस्पती उच्च फुलांच्या वनस्पती आहेत, ज्यात झाडे 33 टक्के, झुडपे 20 टक्के, औषधी वनस्पती 32 टक्के, वेलवर्गीय 12 टक्के आणि इतर 3 टक्के आहेत.

प्राणीजातींच्या विविधतेचा समृद्ध संग्रह

पश्चिम घाटात प्राणिजातीची विविधता आणि स्थानिकतादेखील समृद्ध झाली आहे. यामध्ये 330 फुलपाखरे (11 टक्के स्थानिक), 289 मासे (41 टक्के स्थानिक), 157 उभयचर (85 टक्के स्थानिक), 156 सरपटणारे प्राणी (62 टक्के स्थानिक), 508 पक्षी (44 टक्के स्थानिक) आणि 120 सस्तन प्राणी (12 टक्के स्थानिक) आढळतात. मध्य पश्चिम घाट हा प्राणिजातीच्या विविधतेचा समृद्ध संग्रह आहे.

येथे अनेक दुर्मीळ आणि स्थानिक प्राण्यांच्या प्रजाती राहतात व त्यांचे येथील अस्तित्व या प्रदेशाचे पर्यावरणीय महत्त्व दर्शवते. या प्रदेशात आढळणार्‍या काही प्राणिजातीच्या प्रजाती अत्यंत स्थानिक आहेत आणि अतिसंरक्षित यादीत समाविष्ट आहेत. त्यांना भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा (1972) च्या अनुसूचीद्वारेदेखील संरक्षित केले आहे.

संवर्धनाची जबाबदारी स्थानिकांनीच स्वीकारली

उत्पादकता, महसूलनिर्मिती, रोजगार क्षमता आणि निर्वाहाच्या द़ृष्टिकोनातून पश्चिम घाट अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्थानिकांना लक्षात आल्यावर आता त्यांनीच संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी स्वच्छेने स्वीकारली आहे. पश्चिम घाटाच्या टेकड्यांनी वेढलेल्या अरुंद किनार्‍यावर हिरवळीची वर्षावने, भातशेती आणि नारळ आणि सुपारीच्या बागा आहेत.

येथे पानझडी जंगले आणि झुडपे असलेली जंगले आणि दख्खन पठारावरील ऊस, कापूस, भुईमूग, नाचणी आणि ज्वारीची शेती आढळते. तर, किनारी भागातील व खाडी क्षेत्रातील पाणथळ क्षेत्राचे या जैवविविधता वृद्धीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे.

युनोने 2010 हे वर्ष आंतरराष्ट्रीय जैवविविधतेचे वर्ष म्हणून घोषित केले तेव्हापासून पश्चिम घाटातील समृद्धीसाठी विविध प्रयत्न सुरू झाले आणि गेल्या 15 वर्षांत त्याला मोठे यश आले आहे. वणवे रोखण्यात वन विभागास मिळाले आणि त्यातून जनजागृती झाली. जंगल वाढत असतानाच, नैसर्गिक पुनर्जन्म प्रक्रिया जी खंडित झाली होती, ती पुन्हा गतिमान झाली.
डॉ. अनिल पाटील,ज्येेष्ठ वनस्पती व पर्यावरणतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT