Cyber Fraud  
रायगड

Rs 35 Crore Cyber Fraud | ३५ कोटींचा सायबर घोटाळा उघड !

रायगड पोलिसांचा धडाका, २३ गुन्हे दाखल करत मुख्य सूत्रधाराला ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

रायगड : सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या जाळ्याला छेद देत, ऑनलाइन फसवणुकीतील सर्वात महत्त्वाचा दुवा असणाऱ्या 'म्युल अकाउंट' धारकां विरोधात रायगड जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. या मोहिमेंतर्गत ३५ कोर्टीचा घोटाळा उघड झाला आहे. या धडक मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपासात तब्बल ३५ कोटी ३० लाख ९७ हजार ७६६ रुपयांचा प्रचंड सायबर घोटाळा उघड करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शना खाली सायबर विभागासह स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. आमिष दाखवून बँक खात्यांचा गैरवापर करण्यात आला असून शेअर मार्केटमधील भरघोस परतावा, पार्ट-टाईम नोकरीची आमिषे, डिजिटल अटक आणि एपीके/ओपीके फाईल्सचा वापर करून सायबर भामटे निष्पाप नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या टोळीचे एजंट्स गरजू नागरिकांना कमिशनचे लालच दाखवून त्यांच्या नावे बचत किंवा चालू खाती उघडत असत. त्यानंतर पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक आणि सिमकार्ड स्वतःकडे बाळगून या खात्यांवर फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम वळवली जात होती. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तक्रारींच्या विश्लेषणातून या बँक खात्यांमधील कोट्यवधींच्या संशयास्पद उलाढालीचा पर्दाफाश झाला आहे.

मुख्य सूत्रधारास पोलीस कोठडी

विशेष म्हणजे, या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधारच आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला गेला असून २४ जुलै रोजी या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. न्यायालयाने आरोपीली २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सध्या सर्व म्युल खात्यांचे बँक स्टेटमेंट्स तपासत असून इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांतील गुन्ह्यांशी असणारे यांचे कनेक्शन शोधले जात आहे.

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे :

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमध्ये सायबर पोलीस ठाण्यात १०, खोपोलीत २३.६० कोटींच्या अपहाराचा १, अलिबागमध्ये ५.४८ कोटींचा १, यासह कर्जत, पेण, पोयनाड, कोलाड, रोहा, नागोठणे, रसायनी, माणगाव व श्रीवर्धन येथेही गुन्हे नोंदवून आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

रायगड पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पैसे कमावण्याच्या लालसेने किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडून नागरिकांनी आपली बँक खाती, ओळखीची कागदपत्रे, फोटो अथवा सिमकार्ड अनोळखी व्यक्तींच्या हवाली करू नये, असे आवाहन रायगड पोलीस दलाने केले आहे. एखाद्या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यात झाल्याचे आढळल्यास खातेदारालाही थेट गुन्हेगार मानून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT