रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रोहा बस स्थानकाचे दुरावस्था झाल्याचे दिसून येते. बस उभे राहण्याचे ठिकाण वगळता अन्य ठिकाणी उद्भवलेल्या समस्या राज्य परिवहन महामंडळाने सोडवण्याची आवश्यकता आहे.
रोहा तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोहा शहरात बस स्थानक असून या बस स्थानकातून मुंबई, पुणे, अलिबाग व महाडकडे अनेक प्रवासी प्रवास करत असतात. तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, छोटे, व्यावसायिक, सरकारी अधिकारी व प्रवासी कामानिमित्ताने रोहा शहरात येत असतात. नेहमीच रोहा बस स्थानक गजबजलेले असते. हे बस स्थानक खाजगीकरणातून बांधलेले आहे. बस स्थानकाच्या इमारतीमध्ये व्यावसायिक गाळे आणि बस स्थानक अशी या बस स्थानकाची रचना आहे. पावसाळा सुरू झाला आहे.
पाऊस पडत असल्याने रोहा बस स्थानकाचे छत गळत आहे. त्यामुळे बस स्थानकाच्या इमारतीच्या आवारात व बसण्याच्या ठिकाणी सर्वत्र ओलावा दिसुन येत आहे.बस स्थानकातील बसण्याचे ठिकाण ही ओले झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामा निमित्त व परगावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांवर पाण्याचा शिडकाव होताना दिसत आहे.
बस स्थानकात बस उभे राहत असलेले ठिकाण चांगले काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. परंतु बस स्थानकात प्रवेश करत असलेल्या कोलाड बाजूच्या ठिकाणी मोठा खड्डा असल्याने पाण्याचे डबके झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना व वाहनांना आत येताना पाण्यातून यावे लागत आहे. दुसरीकडे बस स्थानकाच्या आवारात खाजगी चार चाकी व दुचाकी गाड्यांचे पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाकडुन एककडी बस स्थानक स्मार्ट करण्याचे धोरण असताना रोहा बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. प्रवासांचे हित लक्षात घेऊन रोहा बस स्थानकाचे छत गळती थांबवण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे बस स्थानकातील उर्वरित काम लवकर केल्यास सोयीचे होणार आहे.