Rewas Karanja Bridge Pudhari
रायगड

Rewas Karanja Bridge | रेवस-करंजा पुलामुळे मुंबई-अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत!

३,५०० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; ४५ मीटर उंचीचा समुद्री पूल उभारणार, नोव्हेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

Mumbai To Alibaug Travel

पनवेल : मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रेवस-करंजा समुद्री पूल पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. उरण तालुक्यातील करंजा आणि अलिबाग तालुक्यातील रेवस यांना धरमतर खाडीवरून जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठेवले आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे १० किलोमीटर लांबीचा मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये दोन किलोमीटर लांबीच्या समुद्री पुलाचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५ मीटर उंची असलेल्या या पुलाची उभारणी केबल स्टेड गर्डर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली जाणार आहे. त्यामुळे पुलाखालून मोठ्या मालवाहू जहाजांची वाहतूकही विनाअडथळा सुरू राहू शकणार आहे.

प्रकल्पाच्या मार्गात सुमारे ६.५ हेक्टर खारफुटीचे क्षेत्र येत असल्याने पर्यावरण संवर्धनाचे आव्हान आहे. खारफुटीचे नुकसान टाळण्यासाठी संबंधित भागात उन्नत मार्ग उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या पुलाची संकल्पना १९८१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात मांडण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे गेल्या ४५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. उरणचे भाजप आमदार महेश बालदी गेल्या दहा वर्षांपासून मंत्रालय स्तरावर या प्रकल्पासाठी पाठपुरावा करीत आहेत.

दळणवळण आणि पर्यटनाला मिळणार चालना

रेवस-करंजा पूल पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, उरण, पनवेल आणि मुंबई यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. जेएनपीए बंदर, अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेलाही यामुळे बळ मिळेल. अलिबागसह रायगडच्या किनारपट्टीवरील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय आयात-निर्यात व्यापार, मालवाहतूक, औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

चार दशकांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नोव्हेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण झाल्यास मुंबई आणि अलिबागमधील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT