रायगड

Kashedi Ghat : कशेडी घाटातील खचलेल्या रस्त्यावर दुरुस्तीच्या कामाला कासवाची गती!

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची जय भारत कंपनीचे आश्वासन केवळ ठरले पोकळ आश्वासन, १२ गाव २८ वाड्यातील ग्रामस्थ आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Repair work on the collapsed section of the Kashedi Ghat road is proceeding at a snail's pace

पोलादपूर : धनराज गोपाळ मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या मार्गावर सन २००५ च्या अतिवृष्टीमध्ये १०५ फूट लांब रस्ता खचला. या रस्त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र सातत्याने रस्ता खचण्याचे ग्रहण सुटता सुटेना मात्र यावर्षी या रस्त्यावर कॉंक्रिटीकरण करून टेक्नॉलॉजीचा वापर करत रस्ता दुरुस्ती होणार असल्याने गेल्या वीस वर्षाचे ग्रहण सुटणार अशी भावना व्यक्त केली जात आहे.

या कामाला महामार्ग प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेमार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काम अपूर्ण असल्याने आणि संबंधित महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून देण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले की काय असा प्रश्न या विभागातील स्थानिक नागरिक विचारत आहेत.

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर फेब्रुवारी- मार्च २०२६ च्या दरम्यान टेक्नॉलॉजीचा वापर करत कामाला सुरुवात करण्यात आली. याच दरम्यान जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडून या मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध घालून आधी एक महिना नंतर पुन्हा एक महिना असे दोन महिने वाहतूक बंद ठेवून निर्बंध घालण्यात आले होते, मात्र अद्यापही कामाची स्थिती लक्षात घेता काम कासवाच्या गतीने सुरु असल्याची या विभागातील १२ गावे व २८ वाड्यांमधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सुहास मोरे व पळचील माजी सरपंच उमेश मोरे यांनी सोमवार रोजी तहसीलदार कपिल घोरपडे यांची भेट देऊन चर्चा केली यानंतर प्रांत अधिकारी पोपट ओमासे यांची ही दुपारी भेट घेऊन चर्चा केली आणि महामार्गाच्या परिस्थितीचा आढावा प्रांत अधिकारी यांच्यासमोर मांडला. यावेळी प्रांत अधिकारी यांनी संबंधित प्रतिनिधींना आश्वासित करताना सांगितले की, संबंधित महामार्ग अधिकारी व ठेकेदार कंपनी यांच्याशी चर्चा करून लवकरच रस्ता दुरुस्ती पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान या रस्त्यावर सदर काम जय भारत कंपनी मुंबई यांचे मार्फत दरीच्या बाजूकडून सुमारे 100 मीटर लांब व 15 फूट उंच स्टील व दगडाचा वापर करून काँक्रीटीकरण करून महामार्ग बांधण्यात येणार आहे. 6 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्याची उपाययोजना आखण्यात आली आहे.

याबरोबरच डोंगर भागाकडून कातळाच्या बाजूने या ठिकाणी पावसाचे मुरणारे पाणी योग्य पद्धतीने नियोजन करून गटार काढण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी रस्ता खचण्याच्या या वारंवार होणाऱ्या घटना टळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न या विभागातील ग्रामस्थांना पडला आहे.

सन 2005 पासून आजतागायत या ठिकाणी रस्ता खचण्याचे सातत्य आणि दरडी कोसळण्याचे धोका कायम राहिला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहन चालक स्थानिक नागरिक यांच्यातून नेहमीच नाराजीचा सूर उमटत होता. या ठिकाणी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत दागडूजी केली जात होती मात्र रस्ता खचण्याचे ग्रहण कायम राहिले होते.

दरम्यान आता सुरू झालेल्या या कामामुळे प्रवासी जनता आणि वाहन चालकांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु सदरचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. तसेच ते ठरलेल्या वेळेत पूर्ण न झाल्याने या विभागातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनता संतप्त झाली असून हे काम येत्या आठ-दहा दिवसात पूर्ण न झाल्यास आणि पावसाळ्याला जोरदार सुरुवात झाल्यास या मार्गावरील प्रवासी जनतेचा तालुक्याशी संपर्क तुटून प्रवासी जनता आणि नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

या विभागात मौजे पळचील येथे माध्यमिक शाळा व अत्यंत महत्त्वपूर्ण समजले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच या विभागातून माध्यमिक प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची नेहमीच येजा सुरू असते. तसेच आरोग्य कर्मचारी व शिक्षक कर्मचारी यांनाही या महामार्गावरून प्रवास करावा लागतो.

मात्र जुन्या महामार्गावरून गेली दोन महिने एसटी सेवा बंद करण्यात आल्यामुळे या विभागातील नागरिकांना खासगी वाहनाने ज्यादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे विभागातील जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवास करावा लागतो जर महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले नाही तर या विभागातील जनतेला मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार असून तालुक्याशी संपर्क तुटणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

साठी महामार्ग प्रशासन बांधकाम विभाग, संबंधित कंपनी जिल्हा अधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलादपूर यांनी याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT