नेवाळी : कल्याण जवळील श्री मलंगगडावर भाविक गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंदू मंच ठाणे जिल्ह्याच्या वतीने मलंगगडावर प्रत्येक महिन्याची पौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुवारी भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सहभागी झाले होते. चव्हाण यांच्यासमवेत कल्याण जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकार्यांसह साधू नाथ संप्रदायातील महंत देखील श्री मलंगगडावर महाआरती सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गडावर मलंगगड मुक्तीच्या घोषणा देऊन परिसर दणाणून ठेवला होता.
कल्याणच्या श्री मलंगगडावर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त सहभागी झाले होते. श्री मलंगगडावर गुरुपौर्णिमेच्या उत्सवात मुंबई सह ठाणे रायगड जिल्ह्यातील श्री मलंग भक्त सहभागी होत असतात. नुकतीच डोंबिवलीकर व संघाचे स्वयंसेवक राहिलेले रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त चलो श्री मलंगगडचा नारा देण्यात आला होता.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी श्री मलंगगडावर महाआरती करत आई भवानी शक्ती दे श्री मलंगगडाला मुक्ती दे अश्या घोषणा देत गडावरील परिसर दणाणून गेला होता. यावेळी कल्याण जिल्हा भाजपाच्या पदाधिकार्यांसह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.
चव्हाण पहिल्यांदा प्रदेश अध्यक्ष म्हणून मलंगगडावर आल्याने त्यांचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्री मलंग सेवा समिती सह हिंदू मंचाकडून देखील स्वागत करण्यात आले. तर श्री मलंगगडचे वंशपरागत विश्वस्त केतकर कुटुंबाच्या वतीने अभिजित केतकर यांनी प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांचा स्वागत केले आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार रवींद्र चव्हण हे पहिल्यांदाच श्री मलंगगड दौर्यावर आले होते.
यावेळी भाजपच्या वतीने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. प्रत्येक गावाच्या वेशीवर चव्हाण यांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले होते. यावेळी भाजपा आमदार सुलभा गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश मंत्री शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, श्री मलंगगड मंडळ अध्यक्ष समीर भंडारी,माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, राजन चौधरी , रविना अमर माळी यांसह भाजपाचे कार्यकर्ते आणिहिंदू मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.