अलिबाग (रायगड) : सुवर्णा दिवेकर
सलग सहा महिने रेशनवरील धान्याची उचल न केलेल्या रायगड जिल्ह्यातील १२ हजार ९४५ कार्डवरील ३४ हजार ७९४ व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील मिळून ४ लाख ४८ हजार ८६९ एवढी रेशन कार्ड आहेत. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य न उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे. अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
रेशनकार्ड धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लाभार्थी असूनही धान्य उचलत नसल्याने अशा ग्राहकांचे धान्य बंद करून इतर लाभार्थीना मिळावे असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने माहितीच्या आधारे सलग सात महिने धान्याची उचल न केलेल्या १२ हजार ९४५ कार्डवरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद केले आहे.
गेले ६ महिने ज्यांनी धान्याची उचल केली नसेल त्याचा धान्यपुरवठा सरकारच्या आदेशाने बंद केला आहे. मात्र त्यांना पुढील धान्य घेण्यासाठी पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही करावी लागेल मगच धान्य मिळू शकेल.सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत संर्व अंत्योदय आणि प्राधान्य योजनेअंतर्गत मोफत धान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय कार्ड धारकांना प्रति कार्ड ३५ किलो तर प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य ५ किलो मोफत धान्य मिळते. असे असूनही लाभार्थी धान्य उचलत नसल्याचे तपासणी अंती लक्षात आल्यावर गेल्या सात महिन्यापासूनच धान्य बंद केले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ही धान्य दिले नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार ८६९ रेशन कार्ड धारकांपैकी ७५ टक्के कार्डधारकांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे.
कोणाचे रेशन कार्ड रद्द केले जातील?
केंद्र सरकारनाने सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा आदेशा अंतर्गत, ज्यांनी ६ महिन्यांपासून रेशन घेतले नाही त्यांचे कार्ड सक्रिय राहणार नाहीत.
त्यानंतर ३ महिन्यांत, घरोघरी पडताळणी आणि ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन न घेणारे देखील या कक्षेत येतील, देशात २३ कोटी सक्रिय रेशनकार्ड आहेत. या प्रक्रियेत किती कार्ड रद्द केले जातील हे चौकशीनंतर स्पष्ट होईल.