माणगाव : माणगावजवळील खांदाड गावात दुर्मीळ व अतिसंरक्षीत प्रजाती असणारे खवले मांजर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांना दिसले. खवले मांजर अर्थात पँगोलिन हे दुर्मीळ असल्याने गावात मोठ्या औत्सुक्याचे वातावरण निर्माण झाले होते.
गावातील प्राणीमित्र तरुणांनी गावातल्या एका घराच्या शेजारी असणार्या कोपर्यात या खवल्या मांजराची हालचाल पाहिली. तेथे पाहणी केली असता, ते खवल्या मांजर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिक नागरिक आणि वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्राणी मित्रांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याची खातरजमा केली असता, ते खवल्या मांजर म्हणजे पँगोलिन असल्याचे स्पष्ट झाले.
पँगोलिन हे अत्यंत दुर्मीळ आणि संरक्षित प्रजातीतील प्राणी असून, त्याचा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संरक्षित प्राणी यादीत समावेश आहे. भारतात तो वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी मानला जातो. या घटनेनंतर संपूर्ण खांदाड गावात एकच चर्चा सुरू झाली. परिसरातील नागरिक प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले. गावातील वातावरणात एकप्रकारची उत्सुकता आणि आश्चर्य पसरले होते.
या संदर्भात माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी सांगितले की, खांदाड गावात अशा प्रकारचा प्राणी आढळणे ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. हे केवळ गावासाठीच नव्हे तर पूर्ण परिसरासाठी मोठी बातमी आहे. सध्या हा दुर्मीळ प्राणी वनविभागाच्या देखरेखीखाली असून, त्याच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्यात येईल, अशी माहिती वनअधिकार्यांनी दिली.
या वेळी ज्ञानदेव पोवार यांच्यासह खांदाड गावाचे अध्यक्ष काशीराम पोवार, पोलीस पाटील नथुराम पोवार, वनविभागाचे कर्मचारी, प्राणीमित्र व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या खवल्या मांजरा बाबत प्राणीमित्र युवकांनी तातडीने वनविभागाशी केलेल्या संपर्कामुळे या खवले मांजराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून ते खवले मांजर जंगल भागात सुरक्षित स्थळी सोडल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगीतले.