Raksha Bandhan
लाडक्या बहिणींसाठी पोष्टाची अनोखी योजना  file photo
रायगड

Raksha Bandhan 2024 | लाडक्या बहिणींसाठी पोस्टाची अनोखी योजना

पुढारी वृत्तसेवा
पेण ः स्वप्नील पाटील

आपल्या भाऊरायावर अतूट प्रेम करणार्‍या लाडक्या बहिणीसाठी पोस्ट ऑफिस अनोखी योजना राबवत असतो. या योजनेद्वारे पेण पोस्टातून हजारो राख्या देशा परदेशात दरवर्षी जात असतात. यंदा देखील याहून अधिक राख्या देशा परदेशाटील भाऊरायांसाठी जातील अशी अपेक्षा पेण पोष्टाच्या सब पोष्ट मास्टर ज्योती बावकर यांनी व्यक्त केली आहे.

फार वर्षांपासून पोष्ट कार्यालयाला अधिक मागणी असली तरी त्यावेळी पोस्टाने राख्या आत्ताच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात जात नव्हत्या. त्यावेळची असलेली एकत्र कुटुंब पद्धती आणि दूरच्या ठिकाणी किंवा परदेशात वास्तव्यास फार कमी प्रमाणात असणारे भाऊ यामुळे पोष्टाने राख्या आत्ताच्या तुलनेने 20 ते 25 टक्के जात होत्या. मात्र आता वाढती आधुनिकता, देशा परदेशात सहजरीत्या जाण्यासाठी झालेल्या सुविधा तसेच परदेशात शिकण्यासाठी किंवा नोकरी निमित्ताने अनेकांचे वाढते वास्तव्य लक्षात घेता भाऊरायांपर्यंत राख्या वेळेत पोहोचविण्यासाठी सर्वच बहिणी उत्सुक असतात आणि त्यांना पोष्टाद्वारे किंवा स्पीड पोष्टाद्वारे राख्या पोहोचविणे हा मार्ग योग्य वाटतो. त्यामुळे दरवर्षी पोष्टाद्वारे राख्या देशा परदेशात पोहोचविण्याच्या व्यवस्थेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

मागील वर्षाचा विचार करता पेण पोष्टाद्वारे अमेरिका, रशिया यांसारख्या अनेक परदेशात देखील बहिणींनी पोष्टाने राख्या पाठवल्या होत्या. हजारोंच्या वर राख्या मागील वर्षी परदेशात गेल्या होत्या तर आठ ते दहा हजार राख्या देशातील विविध राज्यांमध्ये बहिणींनी पाठवलेल्या राख्या अगदी वेळेत आपल्या भावापर्यंत पोहोचविण्यात पेण पोष्ट ऑफिस यशस्वी झाले होते. यंदा देखील याहून अधिक राख्या देशासह परदेशात रवाना होतील अशी अपेक्षा पेण पोस्टातील सब पोष्ट मास्टर ज्योती बावकर यांनी व्यक्त केली आहे.

बहिणींसाठी अशी आहे पोष्टाची सुविधा

भाऊ कीतीही दुर वास्तव्य करीत असला तरी त्याच्या पर्यंत आपल्या बहिणीची राखी योग्य वेळेत पोहोचावी यासाठी पोस्ट ऑफिस मार्फत पूर्वीपासून राख्या पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. मात्र आता यामधे बदलत्या काळानुसार काही बदल करून साध्या लिफाफ्याने नव्हे तर पावसात लिफाफा भिजू नये यासाठी दर्जेदार कागद वापरून वॉटरप्रुफ विशेष पाकिटे तयार करण्यात आली आहेत. स्पीड पोस्टाने देखील या राख्या पाठवण्यात येत असून पाच रुपयांचा छापील स्टॅम्प आणि दहा रूपये पाकिटाची किंमत अशा रीतीने पंधरा रूपये खर्च करून आपण राखी भावापर्यंत सुखरूप आणि वेळेत पोहचविण्याची प्रक्रिया सुरु करु शकतो.

दरवर्षी आमच्या पोस्टाद्वारे परदेशात हजाराच्या वर तर देशातील विविध राज्यात आठ ते दहा हजार राख्या पोस्टाने अगदी वेळेत पोहोचवतो. यंदा देखील लाडक्या बहिणींसाठी पोष्टाची ही पाकिटे पोस्ट कार्यालयात दाखल झाली असुन अनेक बहिणींनी ही पाकिटे नेली आहेत, इतर बहिणींनी देखील लवकरात लवकर पाकिटे नेऊन पोस्टाच्या या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा.
- ज्योती बावकर, सब पोष्ट मास्टर, पेण
SCROLL FOR NEXT