ajmata Jijau Janmotsav Pachad
इलियास ढोकले
नाते : राष्ट्रमाता जिजाऊंच्या दूरदृष्टी व कर्तबगारीमुळे केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील महिला वर्गाचे सौभाग्याचे कुंकू सुरक्षित राहिले आहे. राजमाता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, तर धर्मावर अत्याचार आणि देवी-देवतांची विटंबना अधिक वाढली असती, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.
राजमाता जिजाऊंच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त पाचाड येथील कार्यक्रमात ते बोलत होते. “जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला म्हणूनच आज सोन्याला चांगले दिवस आले,” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य बाळ राऊळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी बढे, प्रांताधिकारी पोपट ओमसे, तहसीलदार महेश शितोळे, सरपंच सीमा बंदुगडे, पाचाड ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खातू यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधीस्थळी जिजामाता यांच्या पुतळ्यास नामदार गोगावले यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात जयजयकार करण्यात आला.
यावेळी उपस्थित महिला, विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ना. गोगावले म्हणाले की, “जिजाऊंच्या पोटी शिवाजी महाराज जन्मले नसते, तर आजची परिस्थिती कशी असती याची कल्पनाही करता येत नाही. जिजाऊंनी बाल शिवाजींवर धर्मासाठी लढण्याचे संस्कार घडवले. रामायण व महाभारतातील कथा सांगून धर्म व देवतांच्या रक्षणाची शिकवण दिली. त्यामुळेच आज आपण सुरक्षितपणे हे दिवस पाहत आहोत. ‘ते होते म्हणून आपण आहोत’ ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.”
जयंती, राज्याभिषेक व पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, “जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत मंत्री असो वा नसो, मी येथे येतच राहीन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
किल्ले रायगड परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत बोलताना त्यांनी ठेकेदारांना काम दर्जेदार करण्याच्या कडक सूचना दिल्या. पर्यटकांनी कामाबाबत तक्रार करता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. किल्ले रायगड येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ८५ एकर जागेची आवश्यकता आहे. हा प्रकल्प पन्नास कोटी रुपयांत शक्य नसून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. जिवंत चित्रणासह इतिहास भावी पिढीसमोर उभा राहावा, या उद्देशाने काम होत असल्याने विलंब लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कार्यक्रमास पुरातत्त्व खात्याचे अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने ना. गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. “छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी धर्मासाठी त्याग केला नसता, किल्ल्यांचे संरक्षण केले नसते, तर आज पुरातत्त्व खात्याचे अस्तित्वच काय असते?” असा सवाल उपस्थित करत, पुरातत्त्व खात्याने जबाबदारीने काम करावे, अन्यथा शिवभक्तांशी सामना करावा लागेल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.