रायगडात पावसाच्या सरासरीत घट pudhari photo
रायगड

Raigad Rainfall Deficit : रायगडात पावसाच्या सरासरीत घट

जून महिन्यात आतापर्यंत केवळ २.२ टक्केच पडला पाऊस

पुढारी वृत्तसेवा

रायगड : मृग नक्षत्र संपून जूनचा पंधरवडा उलटला तरी रायगड जिल्ह्यात अद्यापही पावसाने गती घेतलेली नाही. कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात पावसाची सुरुवात अत्यंत संथ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, १८ जून पर्यंत रायगड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ २.२ टक्केच पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जून महिन्यात रायगड जिल्ह्याचा सरासरी पाऊस ३९३.५ मिमी इतका असतो. मात्र, १८ जूनच्या दुपारपर्यंत जिल्ह्यात केवळ ८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी जून २०२५ याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३१७.४ मिमी म्हणजेच तब्बल ८०.७ टक्के पाऊस झाला होता. या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा विचार केला तर सर्वच ठिकाणी पावसाची आकडेवारी नीचांकी आहे. दक्षिण रायगडमधील किनारपट्टीच्या भागांत थोडाफार पाऊस झाला असून मुरुड तालुक्यात आत्तापर्यंत सर्वाधिक २६.६ मिमी इतका पाऊस नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल म्हसळा तालुक्यात २४.४ मिमी, श्रीवर्धन तालुक्यात १७.१ मिमी आणि तळा तालुक्यात १६.६ मिमी पाऊस झाला आहे.

औद्योगिक व शहरी भाग असलेल्या पनवेल तालुक्यात आत्तापर्यंत सर्वात कमी म्हणजेच केवळ १.४ मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय पेण तालुक्यात २.७ मिमी, सुधागड तालुक्यात ४.० मिमी आणि कर्जत तालुक्यात ४.२ मिमी पाऊस झाला असून या भागात पावसाने अद्याप म्हणावी अशी हजेरी लावलेली नाही. अलिबाग तालुक्यात आतापर्यंत ६.८ मिमी पाऊस पडला आहे, जो सरासरीच्या (३३८.२ मिमी) तुलनेत केवळ २ टक्के आहे. इतर तालुक्यांचा विचार केला तर खालापूरमध्ये ५.३ मिमी, उरणमध्ये ५.८ मिमी, महाडमध्ये ११.२ मिमी, माणगावमध्ये ८.६ मिमी, रोहा येथे १०.८ मिमी आणि पोलादपूर तालुक्यात १०.० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान,पावसाने ओढ धरल्याने जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर जाणवत आहेत.टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

जून महिना संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील भातशेतीच्या कामांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी धुळवाफ पेरण्या केल्या आहेत, मात्र मोड उगवण्यासाठी आणि रोपांच्या वाढीसाठी मोठ्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. हवामान खात्याने आगामी काही दिवसांत कोकणात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवला असून, आता शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT