Rain Alert pudhari
रायगड

Rain Alert: रायगड जिल्ह्यात पावसाची शक्यता

कृषी विद्यापीठाकडून आंबा, काजू बागायतदारांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

रायगड: रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे. हवामानातील या बदलामुळे काढणीस तयार असलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने खबरदारी घेण्याचे आवाहन विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

हवामान अंदाज आणि इशारा

कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राच्या अंदाजानुसार, 24 एप्रिल रोजी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह सायंकाळी हलका पाऊस पडू शकतो. 25 ते 28 एप्रिल दरम्यान हवामान मुख्यत्वे कोरडे राहील, मात्र कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उन्हाचा चटका कायम असेल. 29 एप्रिल ते 5 मे दरम्यान कोकण विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असून तापमान वाढण्याची शक्यता आहे.

बागायतदारांसाठी तातडीचा कृषी सल्ला : आंबा काढणी : हापूस आंब्याची काढणी नूतन झेल्याच्या साहाय्याने सकाळी 10 वाजेपूर्वी किंवा सायंकाळी 4 नंतरच करावी, जेणेकरून फळांचे तापमान वाढून साका होण्याचे प्रमाण कमी राहील. काढलेली फळे सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवावीत.

काजू संरक्षण: परिपक्व काजू बियांची काढणी तातडीने करून त्या 3 दिवस उन्हात वाळवाव्यात. पावसापासून संरक्षणासाठी वाळत घातलेल्या बिया सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात.

पशुधनाचे व्यवस्थापन

वाढत्या उन्हामुळे जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दुपारच्या वेळी चरण्यासाठी बाहेर सोडू नये. गोठ्यात पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी आणि शक्य असल्यास फॉगर्सचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवावे. कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊन खाद्याच्या वेळा सकाळी किंवा संध्याकाळी ठेवाव्यात.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विद्यापीठ केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ. अशोककुमार चव्हाण आणि नोडल अधिकारी डॉ. वैभव राजेमहाडीक यांनी केले आहे.

फळमाशी नियंत्रण आणि नवीन कलमांची काळजी

आंबा बागेत फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रति एकर 2 या प्रमाणात फळमाशी रक्षक सापळे लावावेत आणि गळलेली फळे नष्ट करावीत. नव्याने लागवड केलेल्या आंबा व काजू कलमांना कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सावलीची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षाच्या कलमांना आठवड्यातून दोनदा 30 लिटर पाणी द्यावे.

भाजीपाल्यची काढणी करा

उन्हाळी भात सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने खाचरातील पाण्याची पातळी 5 सें.मी. पर्यंत नियंत्रित ठेवावी. मिरची, वांगी, टोमॅटो आणि भेंडीची काढणी पावसाची शक्यता लक्षात घेऊन तातडीने उरकून घ्यावी. तसेच, हळद लागवडीसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा योग्य असून बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी, असा सल्लाही विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT