farmer welfare schemes Raigad pudhari photo
रायगड

Raigad News : सुधागडातील मूलभूत प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना तंबी

विकास योजनांच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : शरद निकुंभ

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. केवळ आढावा बैठक घेऊन प्रश्न सुटणार नाहीत; “बैठक संपली म्हणजे काम संपले असे समजू नका, आजपासूनच तुमचे काम सुरू झाले आहे,” अशा शब्दांत रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट तंबी दिली.

सुधागड तालुक्यातील विविध विकास योजनांचा विभागनिहाय आढावा घेताना आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, अंगणवाड्या, रस्ते, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रश्नांवर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

उन्हेरे कुंड येथे असलेल्या राज रिसॉर्ट मध्ये ही आढावा बैठक संपन्न झाली. सभापती वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सभापती जागृती मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे , उपसभापती संदेश शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वारगुडा, सदस्या शर्मिला बोडके, प.समिती सदस्या प्रणिता परदेशी,भाजप च्या ज्येष्ठ नेत्या गीता पालरेचा, भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, नगराध्यक्ष पराग मेहता, नगरसेवक आरिफ मणियार,जिल्हा किसान मोर्चा चे अध्यक्ष सुशील बारस्कर, राजेंद्र राऊत, ओमकार खोडागळे, अधिकारी, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका आणि नागरिक उपस्थित होते.

महिलांसह शेतकऱ्यांसाठी दोन नव्या योजना

रायगड जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सभापती वैकुंठ पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच दोन अभिनव योजना राबविण्यात येत आहेत. कुक्कुटपालन योजना : महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुमारे २० हजार महिलांना लाभ देण्याचे नियोजन आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७५ टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी ९५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला १०० एकदिवसीय कुक्कुट पिल्ले देण्यात येणार असून, योजनेसाठी सुमारे ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाजीपाला किट योजना : कृषी विभागाच्या माध्यमातून पुढील महिन्यात भाजीपाला किट्सचे वाटप करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागावर सभापतींची नाराजी

आरोग्य विभागाच्या कामकाजावर सभापती वैकुंठ पाटील यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तालुक्यात १४ आरोग्य उपकेंद्रे असूनही त्याठिकाणचे काम समाधानकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाली येथे वैद्यकीय अधिकारी नसणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. केवळ आढावा बैठक घेऊन प्रश्न सुटणार नाहीत; “बैठक संपली म्हणजे काम संपले असे समजू नका, आजपासूनच तुमचे काम सुरू झाले आहे.
वैकुंठ पाटील, सभापती, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती, जि.प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT