Raigad Zilla Parishad new building Pudhari
रायगड

Raigad Politics : रायगडचे 'मिनी मंत्रालय' कोणाचे? सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरला!

१२ मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तर ११ मार्चला पंचायत समिती सभापतींची निवड; राजकीय हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमधील सत्तास्थापनेची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी १२ मार्च रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भातील कार्यक्रम जाहीर केला आहे.

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता अलिबाग येथील नियोजन भवनाच्या सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीतच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना २० मार्चपूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक १२ मार्च रोजी आयोजित करण्यात आली असून त्याच दिवशी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठीही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ११ मार्च रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले असून त्या सभांमधून सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तास्थापनेची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार असून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील नवीन नेतृत्व निश्चित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT