रायगड ः रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी पदावर दोन अधिकार्यांनी दावा सांगितल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
डॉ. मनीषा विखे या रायगड जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आरोग्य विभागाने प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली केली. त्यांना ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली. दुसरीकडे विखे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. दयानंद सूर्यवंशी यांची आरोग्य विभागाने नियुक्ती केली होती. त्यानुसार त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर प्रशासकीय कामाचा आढावा घेऊन कामाला सुरुवातही केली होती. गुरुवारी सकाळी डॉक्टर मनीषा विखे पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात दाखल झाल्या आणि त्यांनी आरोग्य अधिकारी पदावर पुन्हा हक्क सांगितला.
प्रशासकीय बदली विरोधात डॉक्टर विखे यांनी मॅट अर्थात महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रीब्युनलमध्ये दाद मागितली होती. त्यावर मॅटने बदलीला स्थगिती दिल्याचा दाबा विखे यांनी केला आहे. म्हणूनच त्या अलिबाग येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात पुन्हा रुजू होण्यासाठी दाखल झाल्या असल्याचे सांगितले.
बदलीनंतर डॉ. विखे यांना पदमुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. सूर्यवंशी यांना शासनाच्या आदेशानुसार रुजू करून घेण्यात आले आहे. डॉ. विखे यांना पुन्हा पदभार देण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने नकार दिला आहे. शासन आदेश येत नाही तोवर डॉ. दयानंद सूर्यवंशी हेच रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी कामकाज पाहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी स्पष्ट केले आहे.