पनवेल : विक्रम बाबर
रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत जिल्हा परिषदेचे 38 नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून 3 अर्ज बाद झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी 81 नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. एकूणच उमेदवारांची संख्या आणि पक्षीय गणित पाहता यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर किती उमेदवार अर्ज मागे घेणार या कडे आत्ता सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या एकूण 8 जागांसाठी तब्बल 38 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 6, भारतीय जनता पार्टीचे 8, शिवसेना शिंदे गटाचे 3, शिवसेना उबाठा गटाचा 1, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 उमेदवार आहे. विशेष बाब म्हणजे यंदा 18 अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीत उडी घेतली असून गव्हाण गणात सर्वाधिक 4 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अनेक गणांमध्ये लढत केवळ पक्षीय न राहता बहुकोनी होताना दिसत आहे.
पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीतही असेच चित्र पाहायला मिळत आहे. एकूण 81 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 13, भाजपचे 16, शिवसेना शिंदे गटाचे 6, शिवसेना उबाठा गटाचे 5, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1, काँग्रेसचा 1 आणि मनसेचे 3 उमेदवार आहेत. मात्र येथेही अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून तब्बल 36 अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पंचायत समितीतील अनेक गणांत तिरंगी आणि चौरंगी लढती अटळ ठरणार आहेत.
यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा परिषदेत प्रवेश आणि मनसेचे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीतील उमेदवार हे निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. यामुळे पारंपरिक दोन पक्षांपुरती मर्यादित राहणारी लढत आता अधिक विस्तारली असून मतांची विभागणी होण्याची शक्यता वाढली आहे. याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षांचे काही गण पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. मात्र अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या आणि इतर पक्षांची उपस्थिती पाहता हे बालेकिल्ले राखण्यासाठी या दोन्ही प्रमुख पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. स्थानिक पातळीवरील नाराजी, वैयक्तिक समीकरणे आणि अपक्ष उमेदवारांची ताकद यामुळे निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहण्याची दाट शक्यता आहे.
ग्रामीण भागाच्या शेजारी असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यात यश आले असले तर याच हद्दीतील काही 29 ग्रामपंचाती या पूर्वी या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाचे भाग होते मात्र आता हे गाण, 29 ग्रामपंचायती पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्या आहेत, त्या ग्रामीण भागात भाजपला मिळालेले अपयश हे विचार करायला लावणारी आहे. ग्रामीण भागातील मतदाराने आजही शेकाप, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना यंदा देखील आपली पसंती दर्शवली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार भाजपकडे वळणार की पुन्हा शेकाप, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपले झुकते माप देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.