संग्रहित छायाचित्र file photo
रायगड

रायगड : मुंबई समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचे काम रखडले

Raigad Fort: स्मारक आता किल्ले रायगडावर साकारावे, अशी जोरदार मागणी

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः सार्‍या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक कीर्तीचे शिवस्मारक उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अरबी समुद्रात त्याचे जलपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हे स्मारक आता किल्ले रायगडावर साकारावे, अशी जोरदार मागणी शिवप्रेमींतून पुढे येऊ लागली आहे.

या 3600 कोटी रुपये खर्चाच्या भव्य शिवस्मारकासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आणलेली माती शिवस्मारकाच्या नियोजित ठिकाणी अर्पण करण्यात आली होती. त्या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वरांज्याची राजधानी राहीलेल्या किल्ले रायगडावर शिवरायांचे यथोचित स्मारक उभारावे, अशी मागणी शिवप्रेमींमधून पुढे आली आहे.

या स्मारकाच्या जलपूजनानंतर पंतप्रधान मोदी यांनी हॉवरक्राफ्टने स्मारकाच्या ठिकाणी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रदक्षिणा घातली. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेव्हाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे, स्व. विनायक मेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

अरबी समुद्रात 16 हेक्टर आकाराच्या खडकावर अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा धातूचा अश्वारूढ भव्य पुतळा प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिल्या आहेत.

शिवस्मारकाचा पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती शासनाने स्थापन केलेल्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष स्व. विनायक मेटे यांनी दिली होती. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुळ्याचा समावेश असेल. दुसर्‍या टप्प्यात आर्ट गॅलरी, म्युझियम, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल, असे सांगण्यात आले होते. या कामाला सुरुवातच न झाल्यामुळे आता किल्ले रायगड येथे शिवस्मारकाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT