महादेव सरसंबे
रोहे: रायगड जिल्ह्यातील सफेद कांद्याला जीआय मानांकन मिळाले आहे. आता वाल व रोठा सुपारीसाठी जिआय मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे सांगितले.
पंचायत समिती रोहा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने रोहा पंचायत समिती येथे आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रयोगशील शेतकऱ्यांचे सन्मान करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, जिप सदस्य उर्वशी वाडकर, निधी जाधव, सुमीत काते, पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे, जगन्नाथ धनावडे, वर्षा देशमुख, समृध्दी कोळी, करुणा हंबीर, गटविकास अधिकारी महादेव शिंदे, माजी सभापती सदानंद गायकर, बाबुराव बामणे, कृषी अधिकारी महादेव करे, पंचायत समिती कृषी अधिकारी रणजीत लवाटे, बाबुराव बामणे, विनोद पाशिलकर, अमित घाग, दिलीप पाबरेकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी 25 ते 50 टक्के रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खतांकडे वळण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो सेंद्रिय शेती कडे वळण्याची आवश्यकता आहे. यंदाच्या वर्षी महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्यावतीने पुढाकार घेण्यात येणार आहे. कृषी विभाग व फलोत्पादन कडुन रोपटे उपलब्ध करुन देत असतात. ती रोपे छोटी नको. मोठी रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे.
शक्यतो ती फळझाडे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाने सातत्याने हवामान खात्याकडून येणाऱ्या सूचनेचा वेळोवेळी माहिती पुरविल्यास त्यांना त्यांचं नियोजन करणे चांगले होईल. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जिल्ह्यातील सफेद कांद्याला जीआय मानांकन मिळाले आहे आता वाल व रोठा सुपारी साठी जिआय मानंकनसाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
संजय मांडलुस्कर यांनी प्रगतशील तालुक्याच्या शेतकऱ्यांचे सन्मान करुन प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश शेतकरी मेळाव्याचे असल्याचे सांगत वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रास्ताविकात महादेव करे यांनी कोकणात खरीप हंगामात भात, नागली, वरी आदीसह अन्य पिके घेतले जात असुन रोहा तालुक्यात याचे 9800 हेक्टर एवढे क्षेत्र आहे.
असे सांगत कृषी विभागाचे विविध योजना, बियाणे, खते, औषधे, विमा, फळ लागवड व खरीप हंगामाची माहीती दिली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक नुकसान बाबतची. माहीती दिली यावेळी शेतकऱ्यांना प्रा. माधव गीत्ते मत्स्य शेती, प्रा.मांजरेकर फळ लागवड, ऋषीकेश कदम पाणी नियोजन, सौरभ दांडेकर बॅक विषयी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या योजना तळागाळापर्यंत माझे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. तालुक्यात शासनाच्या विविध लाभाच्या योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. राज्य व केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांना पोहचवण्यासाठी मी आहे.- वैकुंठ पाटील, सभापती, कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद