Raigad Rain Update
रायगडात आज रेड अलर्ट, समुद्रही खवळणार file photo
रायगड

Raigad Rain Update | रायगडात आज रेड अलर्ट, समुद्रही खवळणार

पुढारी वृत्तसेवा

रायगड : हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. सर्वाधिक पाऊसाची नोंद माथेरान येथे १८८ मिमी झाली आहे. तर रोह्यात कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. बुधवारसाठी पावसाचा रेड अलर्ट (Raigad Rain Update) देण्यात आला असून अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात समुद्राला मोठी भरती येणार असून साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जूनच्या सुरुवातीपासून रायगड जिल्हयात पावसाचे सातत्य आहे. जुलैच्या अखेरीस पावसाचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तर मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात माथेरान येथे १८८ तर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी कर्जत १७१, खालापूर १४३, पनवेल १३६, पेण १३३, तळा १२८, रोहा १०९, उरण १०७, सुधागड १०६, अलिबाग ९५ मि.मी., माणगाव ९०, महाड ८०, पोलादपूर ७३, म्हसळा ७१, श्रीवर्धन ६६ आणि मुरुड ६३ असा एकूण १७६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस माथेरान, कर्जत, खालापूल, पेण, पनवेल या तालुक्यात झाला आहे. जूनपासून आतापर्यंत अलिबाग तालुक्यात सर्वाधिक ९४ टक्के पाऊस झाला आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली होती. जिल्ह्यातील उर्वरित सावित्री, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांची जलपातळी नियंत्रणात व धोका इशारा पातळीच्या खालून वाहत होत्या. अतिवृष्टीमुळे मंगळवारी जिल्हयात कुठेही मोठी दुर्घटना घडल्याची नोंद नाही. जीवजीवन सुरळित सुरु होते.

सध्या उधाणाची भरती सुरु आहे. त्याचप्रमाणे पावसाचे प्रमाणही जास्त आहे. २२ ते २५ जुलैदरम्यान मोठ्या लाटांच्या भरतीचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट

सतत सुरु असलेल्या पावसामुळे गावांना दरडीचा धोका असल्याने प्रशासनाने आतापर्यंत पोलादपूर तालुक्यातील १५ गावांमधील १९३ कुटुंबांतील ५४० व्यक्तींचे स्थलांतर केले आहे. बुधवारसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे काही भागात २०० मिमी पेक्षा अधिक पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट आहे.

SCROLL FOR NEXT