Raigad Rain Pudhari Photo
रायगड

Raigad Rain: रायगड जिल्ह्यात १४,१५ जुलैला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

कोकण कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा कृषी सल्ला

पुढारी वृत्तसेवा

रायगड: ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यासाठी आगामी ५ दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून मिळालेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात ११ आणि १२ जुलै रोजी काही ठिकाणी, १३ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी, तर १४ आणि १५ जुलै रोजी बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ ते २९ जुलै २०२६ दरम्यान कोकण विभागात पर्जन्यमान आणि कमाल तापमान सरासरीएवढेच राहण्याचा अंदाज आहे.

हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला दिला आहे. भाताच्या हळव्या जातींची रोपे (१२ ते १५ सें.मी. उंचीची, ५ ते ६ पाने असलेली आणि २१ ते २७ दिवसांची) तयार असल्यास चिखलणी करून पुनर्लागवड सुरू करावी.

लावणी १५x१५ सें.मी. या २०x१५ सें.मी. अंतरावर सरळ आणि उथळ करावी. एका चुडात ३ रोपे आणि संकरित भातासाठी १ रोप लावावे. भात आणि नागली रोपवाटिकेला १५ दिवस पूर्ण झाले असल्यास प्रति गुंठा १ किलो युरिया खताचा दुसरा हप्ता द्यावा. खते देण्याचे काम पावसाची तीव्रता कमी असताना किंवा उघडीप असतानाच करावे.

भुईमूग लागवड पेरणी टोकण पद्धतीने उपट्या जातीसाठी ३० सें.मी. आणि निमपसऱ्या जातीसाठी ४५ सें.मी. ओळीतील अंतर ठेवून करावी. पेरणीच्या वेळी प्रति गुंठा ५५० ग्रॅम युरिया, ३१५० ग्रॅम एसएसपी आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. कारळा पेरणी बियाणे बारीक असल्याने पेरणीपूर्वी त्यात १:१ प्रमाणात बारीक वाळू मिसळावी आणि ३०x१५ सें.मी. अंतरावर २-३ सें.मी. खोलीवर पेरावे.

खत मात्रा पावसाचा जोर कमी असताना अन्नद्रव्यांचे नुकसान टाळण्यासाठी आंबा व नारळाच्या झाडांना शिफारशीत खते द्यावीत. १० वर्षांवरील आंब्याच्या झाडाला ५० किलो शेणखत, ३.२५० किलो युरिया, ३.१२५ किलो एसएसपी आणि २ किलो सल्फेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावे. पाच वर्षांवरील नारळाच्या झाडाला ५० किलो शेणखत, २.१७ किलो युरिया, ३.१३ किलो एसएसपी आणि ३.३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.

नवीन लागवड आंबा, काजू, सुपारी आणि नारळाच्या नवीन लागवडीसाठी विद्यापीठाच्या किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळाच्या अधिकृत रोपवाटिकेमधूनच निरोगी व किड-रोगमुक्त कलमे खरेदी करावीत. लागवड करताना मातीचा गोळा फुटणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कलमांना काठीचा आधार द्यावा. भाजीपाला पेरणी दोडका, लाल भोपळा, दुधी भोपळा व घोसाळी यांची पेरणी सुरू ठेवावी. खोडकुज रोगाच्या नियंत्रणासाठी २ ग्रॅम 'ट्रायकोडर्मा' प्रति आळे शेणखतात मिसळून टाकावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT