रायगड : जयंत धुळप
यंदाच्या पावसाळ्यात कोकण किनारपट्टीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत एकूण 18 दिवस 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यातील जून महिन्यात पाच दिवस, जुलै महिन्यात चार दिवस, ऑगस्ट महिन्यात पाच दिवस, तर सप्टेंबर महिन्यात चार दिवस मोठ्या लाटा येणार आहेत. कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या जिल्ह्यांच्या किनारपट्टी आणि खाडीकिनारी एकूण 800 गावे असून, या सर्व गावांमध्ये आपत्ती निवारण यंत्रणांना विशेष दक्षता देण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
कोकण किनारपट्टीत समुद्र-खाडीकिनार्याची सर्वाधिक 147 गावे रायगड जिल्ह्यात आहे;. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्यात 92, ठाणे जिल्ह्यात 37, रत्नागिरी जिल्ह्यात 54, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 47 गावे आहेत. रायगड जिल्ह्यात समुद्र किनार्यावरील असलेल्या 67 गावांपैकी सर्वाधिक 30 गावे अलिबाग तालुक्यात आहेत, तर उर्वरित तालुक्यांमध्ये श्रीवर्धनमध्ये 19, मुरुडमध्ये 9, पनवेलमध्ये 5, तर उरण तालुक्यात 4 गावे आहेत. रायगडच्या खाडीकिनारी एकूण 80 गावे असून, त्यातील सर्वाधिक 20 गावे म्हसळा तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत अलिबाग, पनवेल आणि श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी 11 गावे आहेत. तर, पेणमध्ये 9, मुरुडमध्ये 8, माणगावमध्ये 6 आणि उरण तालुक्यात 5 गावे आहेत.
मोठ्या समुद्र लाटांचा संभाव्य धोका असणार्या किनारपट्टीतील समुद्र व खाडीकिनार्याच्या या सर्व गावांमध्ये आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपत्तीपूर्व प्रशिक्षण देऊन, आपत्तीपूर्व आणि आपत्तीदरम्यान घ्यावयाच्या दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात आपत्ती प्रतिसाद चमूची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, आपत्तीपूर्व सतर्कतेचा इशारा देण्यारी यंत्रणादेखील किनारपट्टीत सज्ज करण्यात आली आहे.