Raigad Water Shortage
गाव वाड्यांवर ना पावसाचे पाणी, ना टॅंकरचे; पाणीटंचाई कायम  
रायगड

Raigad Water Shortage | गाव वाड्यांवर ना पावसाचे पाणी, ना टॅंकरचे; पाणीटंचाई कायम

पुढारी वृत्तसेवा
रायगड : किशोर सुद

रायगड जिल्ह्यात या वर्षी पाणीटंचाईची समस्या सर्वाधिक दिसून आली. जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील 200 हून अधिक गाव-वाड्यांना 58 टँकर्सने पाणीपुरवठा सुरु होता. त्यानंतर झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्याने टँकर बंद करण्यात आले. जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात 14 टँकर्स सुरु होते. 30 जूनपर्यंतची टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने शासनाकडून तेही टँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र 4 जुलै उजाडला तरी टंचाईग्रस्त भागात पुरेसा पाऊस न झाल्याने या गाव-वाड्यांवर ना पावसाचे पाणी, ना टँकरचे पाणी, ना जलजीवनचे पाणी; त्यामुळे जिल्हयातील गाव-वाड्यांवर आजही पाणीटंचाई कायम असून टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे.

रायगड जिल्हयासाठी सन ऑक्टोबर 2023 ते जून 2024 या काळातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी सुमारे अडीच कोटींचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला होता. त्यात 608 गाव व वाड्यांवर पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी वाढलेले तापमान यामुळे जलाशांमधील पाण्याची मोठी घट होऊन पाणी टंचाई तीव्र बनली होती. जून महिन्यात जिल्हयात सुमारे अडीचशे ते तीनशे गाव वाड्यांवर 58 टँकर्सने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती.जिल्हयात जून महिन्यात पुरेसा पाऊस पडल्यावर जलाशयांची पातळी वाढल्याने टंचाईग्रस्त भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र यावर्षी सरासरी इतका मान्सूनचा पाऊस अद्यापही झालेला नाही. त्यामुळे जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा तयार झालेला नाही.

पावसाचे प्रमाण कमी असल्याने अलिबाग तालुक्यातील रेवस- रांजणखार डावली येथे अद्यापही पाणी टंचाई सुरु आहे. तर जिल्ह्यात इतर भागातही अद्यापही पाणी टंचाई असण्याची शक्यता आहे. ३० जूनपर्यंतची टंचाई आराखड्याची मुदत संपल्याने शासनाकडून पाणी पुरवठ्याचे टैंकर बंद केले आहेत. मात्र ४ जुलै उजाडला तरी टंचाईग्रस्त भागात पुरेसा पाऊस न झाल्याने या गाव-वाड्यांवर ना पावसाचे पाणी, ना टँकरचे पाणी की ना जलजीवनचे पाणी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हयातील गाव-वाड्यांवर आजही पाणीटंचाई कायम असून टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून टँकरची मागणी करण्यात आली आहे. रेवस ग्रामपंचायत हद्दीत जल जीवन मिशनच्या दोन योजना रेवस व कावाडे गावासाठी असून त्यातून अद्याप पाणी पुरवठा सुरु झालेला नाही. पाऊस कमी असल्याने ग्रामपंचायत हद्दीत अद्यापही पाणी टंचाई आहे. मात्र शासनाचे पाणी पुरवठ्याचे टंकर्स ३० जूनपासून बंद झाले आहेत, असे रेवस ग्रामपंचायतचे माजी सरपंच मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, शासनाचा पाणीटंचाई आराखड्याची समाप्ती ३० जूनला होते. पावसाचे प्रमाण कमी असल्यास ३० जूनपर्यंत टैंकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र त्यानंतर पुरेसा पाऊस होऊन पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाई आराखड्याची मुदत ३० जूनपर्यंत असते. त्यानंतरही पाणी टंचाई असल्यास ग्रामपंचायती गटविकास अधिकाऱ्यामार्फत टँकरची मागणी नोंदवू शकतात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही मागणी गेली की शासनाला कळविले जाते. दरम्यान, अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

रांजणखार-डावली ग्रामपंचायतीत जलजीवन मिशन योजनेचे काम साडेतीन वर्षांपूर्वीच सुरु झालेले आहे. मात्र अद्याप पाणी पुरवठा सुरु झालेला नाही. येथे शासनाकडून टँकरने सुरु असलेला पाणी पुरवठा 30 जूनपासून बंद झाला आहे. ग्रामपंचायत हद्दीत सध्या पिण्यासाठी पाणी नसल्याने ग्रामस्थांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी उपलब्ध होईपर्यंत शासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरु ठेवावा, यासाठी पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र अद्याप टँकरने पाणी पुरवठा सुरु झालेला नाही.
- हेमंत पाटील, माजी सरपंच, रांजणखार-डावली ग्रामपंचायत.
SCROLL FOR NEXT