सुवर्णा दिवेकर
अलिबाग: दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 4 तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या चार तालुक्यातील 72 गावे व वाड्यांमधील सुमारे 28 हजार नागरिकांना 15 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे.
पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत असून, दोन-ते तीन किलोमीटरची पायपीट करुन त्यांना पाणी आणावे लागत आहे. मागील तीन आठवड्यात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे-वाड्यांमध्ये 55 ने वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही योग्य नियोजनाअभावी रायगड जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील नद्यांवर पुरेशी धरणे नसल्याने पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते.
या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टंचाई निवारण आराखडा तयार करुन, उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येते, मात्र हे नियोजन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरेशे नसल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्याला सध्या तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी अलिबाग, पेण, महाड, कर्जत या चार तालुक्यांमधील 12 गावे व 60 वाड्यांवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
या गावे वाड्यांना 15 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याचे दिसून येते. यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, त्यांना दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी खासगी टँकरच्या माध्यमातून विकतचे पाणी नागरिक मागवित असल्याचे चित्रही दिसून येते. दरम्यान, जलजीवन मिशन योजना राबवूनही जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.