Tree Cutting Pudhari File Photo
रायगड

Raigad Water Crisis Deforestation: पाणीटंचाई,तापमान वाढीस वृक्षतोड कारणीभूत; वृक्ष जतन व संवर्धनाची आवश्यकता!

मागील पाच वर्षांत महाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळा सुरू होताच पाण्याचे संकट तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

महाड: महाडसह संपुर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली भीषण पाणीटंचाई आणि सतत वाढणारे तापमान हा चिंतेचा विषय बनला असून या गंभीर परिस्थितीमागे मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड हे प्रमुख कारण असल्याचे पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.

मागील पाच वर्षांत महाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळा सुरू होताच पाण्याचे संकट तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक गावांतील विहिरी, बोअरवेल, ओढे आणि नैसर्गिक जलस्रोत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.

महाड तालुका हा निसर्गसंपन्न आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या काही वर्षांत विकासकामे, रस्ते, बांधकामे आणि विविध प्रकल्पांच्या नावाखाली

पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून त्याचा थेट परिणाम पावसाच्या प्रमाणावर, भूजल साठ्यावर आणि तापमानावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पूर्वी वर्षभर पाण्याने भरलेल्या विहिरी आता उन्हाळ्यात कोरड्या पडू लागल्या आहेत. काही भागांमध्ये मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता घटली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी थेट नद्यांमधून समुद्राकडे वाहून जात आहे. त्यामुळे भूजल पातळी वर्षागणिक कमी होत आहे. याशिवाय वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धरणे, तलाव, विहिरी आणि शेततळ्यांमधील पाणी झपाट्याने आटत असल्याने शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेणे अशक्य बनले असून पशुधनासाठीही पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पूर्वी महाड परिसरात दाट जंगल आणि मोठ्या प्रमाणावर हिरवाई असल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत असे. मात्र आता उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होत असून उष्माघातासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी उकाड्याची तीव्रता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोहिम राबवण्याची गरज व्यक्त केली आहे.

विशेषतः डोंगर उतार, नदीकिनारे, सार्वजनिक मोकळ्या जागा आणि शासकीय जमिनींवर स्थानिक जातींची झाडे लावण्यावर भर देण्याची मागणी होत आहे. फक्त वृक्षलागवड करून थांबून चालणार नाही, तर त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

जलसंधारणाची कामे, शेततळी, बंधारे, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प आणि भूजल पुनर्भरणाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. प्रशासनाने वृक्षतोडीवर नियंत्रण आणून पर्यावरण संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणीही होत आहे.

...अन्यथा गंभीर परिस्थिती

आज वृक्ष वाचवले ,वृक्षलागवड केली तरच भविष्यातील पाणीटंचाई व तापमान नियंत्रण शक्य होईल. अन्यथा येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती नाकारता येणार नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT