गडब (रायगड ) : प्रदीप मोकल
रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतच आहे, त्यातच काही शेतकऱ्यांनी भात कापणी केली आहे. भात कापणी करत आहेत. बांधणी करत आहेत तर अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी थेट कापणी करुन लगेच भात झोडणी मळणी करत आहेत त्यामुळे शेतमजुरांची मागणी वाढल्याने शेतमंजूर मिळणे कठीण झाले आहे तर येथे वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे अनेकांनी त्या ठिकाणी रोजगार शोधला आहे.
शेतीच्या कामांसाठी शेतमजूर मिळणे कठीण झाले असून शेतात काम करणारे शेत मजुरांनी शेतीकडे पाठ फिरविल्यांचे दृश्य पेण तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. शेतीच्या कामांसाठी त्यांची मनधरणी करावी लागणार आहे, त्याचबरोबर सध्या ऑक्टोबर हिटमुळे सुरुवातीपासूनच उष्णता असल्यामुळे या रणरणत्या उन्हामध्ये मजूर हैराण होत असल्यामुळे भात कापणीस नकारात्मक भूमिका बजावत आहेत.
शेतामध्ये तयार झालेला भात परीपक्व झाला आहे. परंतु उन्हाच्या उष्णतेने व अवकाळी पडणा-या पावसामुळे भाताच्या लोंब्यापासून दाणे अलग होत असल्यामुळे या वर्षी पिक उत्तम आले असून हातात हवे तेवढे धान्य मिळणार की नाही? अशी स्थिती बळीराजाची निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून भातपीके जोमाने वाढवून शेतजमीन फुलवुन धान्य निर्माण करीत आहे. तर दुर्गम भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी परतीच्या प्रवासाला लागत असल्याने आता जे उपलब्ध होतील त्या मजुरांची मनधरणी करून लवकरात लवकर भात कापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी वर्ग आहेत.
यंदा चित्रविचित्र पाऊस पडल्याने अनेकांच्या शेतांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला भाताचा घास निसर्गाच्या प्रकोपामुळे मिळेल की नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विदर्भ, मराठवाडा, उस्मानाबाद प्रमाणे नुकसान झालेल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी. मात्र शेतकऱ्यांवर कितीही संकट आली तरी कोकणातील शेतकरी आत्महत्येचा विचार करणार नाही.के. जी. म्हात्रे, शेतकरी, गडब-पेण
तर काही ठिकाणी भात झोडणीला प्रारंभ झालेला आहे. काही भागात मजुरांची उपलब्धता नसल्याने घरच्या घरी भात कापणी करावी लागते तर काही ठिकाणी मजुरांची मजुरी ६०० ते ८०० रुपयांपर्यत गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचा खर्च परवडत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलेले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी घरच्या घरी भात झोडणी सुरु केली आहे. यामुळे अवकाळी पाऊस व रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शेतात तयार झालेले धान्य घरी आणण्याची लगबग सुरु झाली आहे. पेण तालुक्यात अवकाळी परतीच्या पावसाने थैमान घातले असून कापलेले भात पिक पावसात भिजले आहे तर काही ठिकाणी भातपिके पडली असल्याने भातपिक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी नुकसाणीला सामोरे जावे लागणार असल्याने शासनाने येथील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.