अलिबागच्या मच्छीला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे अलिबागमधील मासळी बाजारात स्थानिकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे Pudhari News Network
रायगड

रायगड : अलिबाग शहरातील मासळी बाजारासाठी दुमजली इमारत

मासळी विक्रेत्या महिलांना मिळणार हक्काची जागा; वाहतूककोंडी होणार दूर

पुढारी वृत्तसेवा

रायगड : अलिबागच्या मच्छीला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. त्यामुळे अलिबागमधील मासळी बाजारात स्थानिकांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. वाढत्या ग्राहकांमुळे अलिबाग शहरासह आजूबाजूच्या परिसरात मासळी विक्रेत्या महिलांची सुद्धा संख्या वाढत आहे. अलिबाग शहरातील पीएनपीनगर येथील मासळी बाजारामध्ये विक्रेत्या आणि ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे मासळी विक्रेत्यांना मासळी विक्री करणे व ग्राहकांना ती विकत घेण्यासाठी अडचणी येतात. यासाठी आता येथे मासळी बाजारासाठी दोन मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. येत्या जूनपर्यंत हे बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

अलिबाग शहरातील पीएनपी नगरच्या मागील बाजूस सुरू असलेल्या मासळी बाजाराच्या इमारतीचे काम काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडले होते. मात्र आता कामाला गती आली असून, दुमजली इमारत लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छी विक्री करणार्‍या महिलांना आपली मासळी विकण्यासाठी हक्काची व स्वच्छ जागा उपलब्ध होणार आहे.

शहरातील पीएनपीनगर येथील मासळी मार्केटची इमारती जुनी व मोडकळीस आली होती. या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने कोळी महिलांना रस्त्याच्या कडेला बसून मासळीविक्री करावी लागते. त्यामुळे परिसरात गर्दी व अस्वच्छता पसरते. आता नवीन दुमजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीत जास्तीत जास्त विक्रेत्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी, वाहतूककोंडी कमी होईल. इमारतीचे काम फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर पावसाळा आणि निवडणूक आचारसंहिता, तर काही मासळी विक्रेत्यांनी केलेल्या विरोधामुळे इमारतीचे काम रखडले होते.

आता स्थानिकांचा विरोध मावळल्यानंतर इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून विक्रेत्यांना त्रास होणार नाही. मच्छी मार्केटमध्ये तयार होणार्‍या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. यासाठी ओडब्ल्यूसी (ऑरगॅनिक वेस्ट) मशीन घेण्यात येणार आहे. यामुळे हा कचरा टाकण्याचा अथवा त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. मासळी विक्री करणार्‍या महिलांसह खरेदी करण्यासाठी येणार्‍यांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. तसेच ड्रेनेजची व्यवस्था असेल. त्यामुळे मासळी धुतल्यानंतर ते पाणी रस्त्यावर टाकण्याची वेळ येणार नाही.

यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, जूनअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या ठिकाणी उभारण्यात येणारी इमारत सर्वसमावेशक असून, सर्व विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्यासाठी तरतूद केली आहे.
सचिन बच्छाव, मुख्याधिकारी
मासळी मार्केट इमारतीचे काम फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. काही कारणांमुळे काम रखडले. आता कामाला गती आली असून जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
संतोष मुंढे, नगरअभियंता, अलिबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT