मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
शुक्रवारी गुरुनानक जयंती असल्याने सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी होती. याचे औचित्य साधून हजारो पर्यटक शुक्रवारपासूनच मुरुड, काशीदसह अलिबाग समुद्र किनारी मोठ्या संख्येने आलेले आहेत. शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवसाच्या सुट्ट्या उपभोगण्यासाठी पर्यटकांनी काशीद व मुरुड समुद्र किनार्याला येणे खूप पसंत केले आहे. काशीद समुद्र किनारी सर्वाधिक पर्यटक येत असतात.
आज रस्त्याच्या दोन्ही बाजूस चार चाकी गाड्यांची मोठी गर्दीच गर्दी होती. त्यामुळे येथे वाहतूक सुद्धा मंदावली होती. गाड्यांची मोठी संख्या तसेच रोजच्या रोज जाणारी वाहतूक यामुळे वाहतूकीस मोठी समस्या निर्माण झाली होती. सलग गाड्यांची संख्या वाढल्याने ही मोठी समस्या निर्माण झाली होती. काशीद येथील 64 टपर्यांमधून पर्यटकांच्या खानपान व्यवस्था सांभाळली जाते. त्याचप्रमाणे समुद्रात पोहण्यासाठी विविध कपडे सुद्धा पुरविण्यात येतात. काशीद समुद्र किनारी उंट सफारी, घोडेस्वारी, बनाना रायडींग, आदींचा भरपूर आनंद पर्यटकांनी घेतला आहे.
यावेळी काशीद येथील सर्व हॉटेल व लॉजिंग हाउसफुल होती. सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. यावेळी मुरुड समुद्र किनार्यावर सुद्धा गर्दी पहावयास मिळाली. त्याच प्रमाणे सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पहाण्यासाठी महाराष्ट्रातील विविध विभागातून मोठ्या संख्येने पर्यटक सुद्धा आले होते. राजपुरी वाहनतळ येथे वाहनांची गर्दीच गर्दी होती. जंजिरा किल्ला येथील वाहनतळ हाऊस फुल झाल्याने पर्यटकांनी समुद्र किनारी आपल्या असंख्य गाड्या पार्किंग केल्या होत्या. जंजिरा पर्यटक जल वाहतूक सोसायटीतर्फे सर्व पर्यटकांना शिडांच्या बोटींमधून सुखरूप किल्ल्यावर ने-आण केली जात होती.
महाराष्ट्रातील औरंगाबाद, परभणी, पुणे, कल्याण, डोंबिवली आदी भागातून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पहाण्यास आले होते. पर्यटकांची संख्या वाढल्याने समुद्र किनारे अगदी तुडुंब भरून गेले होते. सध्या पर्यटनाचा मौसम सुरु झाल्याने येथील स्थानिक हॉटेल व लॉजिंग मालकांनी समाधान व्यक्त केले आहे.