रायगड : रायगड जिल्ह्यात पर्यटनचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांनी सर्व तयारी केली आहे. जिल्ह्याच्या समुद्रकिनार्यांवर सध्या थोड्या प्रमाणात पर्यटक आहेत. येत्या आठ-दहा दिवसात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
रायगड जिल्ह्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, येथील ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणे हे पर्यटकांचे आकर्षणाची प्रमुख केंद्रे आहेत. अलिबागमधील वरसोली, मांडवा, किहीम, नागाव, मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, श्रीवर्धनमध्ये दिवेआगर, हरिहरेश्वर आदी किनारी भागातील ठिकाणे प्रसिद्ध आहेत. याच भागात पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो. सुंदर किनार्यांमुळे किनारपट्टीवरील भागात सर्वाधिक पर्यटकांची गर्दी होत असते. सध्या पावसाळा संपल्याने पर्यटन ठिकाणांकडे पर्यटक येऊ लागले आहेत. आता दिवाळीची सुट्टी सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात किनारपट्टीवर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील हॉटेल, कॉटेजेस, शेतघर, गार्डन येथे रंगरंगोटी आणि आवश्यक सुविधा अद्यावत करण्यात येत आहेत. पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी हा व्यवसायिकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पर्यटक येतात याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. किल्ले रायगड, किल्ला जंजिरा, किल्ला कुलाबा, कर्नाळा आदी प्रमुख ऐतिहासिक स्थळांवर पर्यटक भेटी देत असतात. तसेच धार्मिक पर्यटनासाठी येथे हजारो पर्यटक येतात. सुधागड तालुक्यातील पाली बल्लाळेश्वर आणि खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक ही दोन अष्टविनायकाची ठिकाणे, श्रीवर्धनमधील सुवर्ण गणेश मंदिर येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. याही ठिकाणी आता पर्यटकांचे आगमन सुरू होणार आहे. सध्या तरी पर्यटन व्यवसायिकांचे डोळे पर्यटकांच्या आगमनाकडे लागले आहेत.
सुधागड तालुक्यातील पाली बल्लाळेश्वर आणि खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक ही दोन अष्टविनायकाची ठिकाणे, श्रीवर्धनमधील सुवर्ण गणेश मंदिर येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. याही ठिकाणी आता पर्यटकांचे आगमन सुरू होणार आहे. सध्या तरी पर्यटन व्यवसायिकांचे डोळे पर्यटकांच्या आगमनाकडे लागले आहेत.