कळंबोली : कळंबोली शहरांमध्ये अनेक दिवसापासून के एल वन ,के एल टू, सेक्टर 3,4, 5 या भागात अत्यंत कमी दाबाने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच आठवड्यातील दोन-तीन दिवस पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने वसाहतीेमध्ये पाण्याचा समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
सिडकाेकडून नियमित पाणीपुरवठा होत होता परंतु महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमित व दूषित होत असून पाण्याचे बिलेही अव्वाच्या स्वव्वा वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत कळंबोलीतील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सिडको अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन हंडा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कळंबोली शहरातील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की आपण शहरात राहतो की खेड्यात राहतो. यापूर्वी सिडको करून होत असलेला पाणीपुरवठा उच्च दाबाने स्वच्छ पाण्याचा होत होता. 120 रुपये दोन महिन्याच बिल घेतले जात होते. परंतु महानगरपालिका आल्यानंतर सिडको ने पाण्याची मीटर लावले. जिथे 120 रुपये यायचे तिथे आज हजार ते पंधराशे रुपये दरमहा पाण्याची बिल येत आहे. एवढे बिल भरूनही पिण्याचे स्वच्छ पाणी प्रशासनाकडून नियमितपणे दिले जात नाही आहे. याविषयी कळंबोली शहर मनसे तर्फे सिडकोला कळंबोली प्रभाग 8 चें उपविभाग अध्यक्ष विवेक बोराडे यांनी पत्राद्वारे इशारा देण्यात आला की येत्या आठ दिवसाच्या आत शहरांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा उच्च दाबाने जर केला नाही तर कळंबोली शहर मनसेतर्फे महिलांचा प्रचंड मोठा हंडा मोर्चा आणण्यात येईल. तसेच निर्माण होणार्या परिस्थितीला आपले प्रशासन जबाबदार असेल असे सांगण्यात आले आहे. यावेळी मनसेचे नितीन काळे, महिला जिल्हा सचिव स्नेहल बागल, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश तिवारी, महाराष्ट्र सैनिक योगेश इंगळे उपस्थित होते.