रो-रो जलवाहतुकीचा वेग वाढणार, दुसरी बोट तिप्पट वेगाने धावणार file photo
रायगड

Raigad | रो-रो जलवाहतुकीचा वेग वाढणार, दुसरी बोट तिप्पट वेगाने धावणार

मांडवा-भाऊचा धक्का दुसर्‍या रो-रो बोटीची चाचणी, सप्टेंबरनंतर सेवेत दाखल

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरादरम्यानचा सागरी प्रवासाला आता आणखी वेग येणार आहे. दुसर्‍या रो-रो बोटीचा स्पीड पहिल्या बोटीपेक्षा तीन पटीने जास्त आहे. त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग दरम्यानचा रो-रो प्रवास अवध्या 25 मिनिटांचा होणार आहे. पर्यटकांचा वाढता ताण लक्षात घेऊन कंपनीने 55 कोटींची दुसरी रो-रो बोट ग्रीसवरून खरेदी केली. या बोटीची पहिली ट्रायल नुकतीच डोमेस्टिक क्रुझ टर्मिनस ते मांडवा बंदरादरम्यान घेण्यात आली.

पावसाळ्यात अलिबागमधील मांडवा आणि रेवस बंदर येथील मुंबई गेटव ऑफ इंडिया व भाऊचा धक्का ही प्रवासी जलवाहतूक बंद राहत असे. मात्र चार वर्षांपूर्वी ही रो-रो सेवे सुरु झाली. पावसाळ्यातही ही जलवाहतूक सुरु झाली आहे. 500 प्रवासी व 150 वाहनांची क्षमता, सुरक्षा यंत्रणा, इतर अद्ययावत सुविधांमुळे इतर बोट सेवेपेक्षा खर्चिक असली तरी रो-रो बोटसेवा लोकप्रिय झाली आहे. विशेष करून मुंबईतील पर्यटकांना आपल्या वाहनांसह अलिबाग मार्गे रायगड जिल्हयात येणे शक्य झाले आहे. मुंबई ते अलिबाग तालुक्यातील मांडवा दरम्यान चालणार्‍या अत्याधुनिक रो-रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन वर्षांत लाखो मुंबईकरांनी या रो-रोतून समुद्र सफरीचा आनंद लुटला आहे. त्यातच या बोटीवर पर्यटकांचा वाढता ताण लक्षात घेऊन कंपनीने 55 कोटींची दुसरी रो-रो बोट ग्रीसवरून खरेदी केली. ही बोट काही महिन्यांपूर्वीच मुंबईत दाखल झाली होती. 15 जुलै रोजी या अत्याधुनिक बोटीचे डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते मांडवा दरम्यान ट्रायल घेण्यात आली.

सध्या धावत असलेल्या रो-रो बोटीचा वेग 12 नॉटिकल माइल्स असून साधारण 10 नॉटिकल माइल्सच्या वेगाने ती धावते. या बोटीने भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानचे 14 कि.मी अंतरासाठी 45 मिनिटांचा कालावधी लागतो. या नव्या रो-रो बोटीचा स्पीड 30 नॉटिकल माइल्स असून मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदर हे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पार करता येणार आहे. नवीन रो-रो बोटीची 500 प्रवासी आणि 150 वाहन अशी क्षमता आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. दोन रो-रो बोटींमुळे आता जलवाहतूक सेवा अधिक भक्कम होणार आहे. त्यातच सागरी महामंडळ मुंबई ते काशीद आणि मुंबई ते दिघीदरम्यान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईपासून अलिबागपर्यंतचा हा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. ग्रीसवरून आयात करण्यात आलेल्या या रो-रो बोटीची आणखी एक चाचणी येत्या काही दिवसांत घेण्यात येणार आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ही बोट सेवेत येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे.

प्रदूषण- वाहतुककोंडी समस्या कमी

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान वर्षाला सुमारे 15 लाख जण प्रवास करतात. मांडव्यापर्यंतचा प्रवासाचा कालावधी 45 मिनिटे ते एक तासाचा आहे. रो रो सेवेमुळे तो कमी झाला आहे. एकावेळी एक हजार प्रवासी आणि 200 गाड्या वाहून नेण्याची क्षमता पहिल्या बोटीची आहे. नवीन रो-रो बोटीची 500 प्रवासी आणि 150 वाहन अशी क्षमता आहे. मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावरील रोरो जलवाहतुकीला नागरिक आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन आणि वाहतुककोंडीची समस्याही कमी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT