खोपोली : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील हाळ बुद्रुक गावाच्या बाजुच्या रस्त्यावर बैल आणि गाईचे मांस घेवून जात असताना गोरक्षकांनी बुधवारी (दि.12) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पकडले. यादरम्यान हाळ गावातील समाजकंटक महिलांनी आणि गावकर्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला. या दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले आहेत. खालापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत बाराजणांना अटक केली आहे. तर दगडफेक करणारे अनेकजण फरार आहेत. गाईची हत्या करणार्यावर मोक्का लावण्याची मागणी गोरक्षकांनी करीत अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे.
खालापूर तालुक्यातील हाळ गावाजवळील सागर कॅफे हॉटेलच्या टेम्पोतून दोन बैल दाटीवाटीने कत्तल करण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. यावेळी गोरक्षकांनी टेम्पो अडविला असता बैल शर्यतीसाठी घेवून जात असल्याचे सांगण्यात आले आणि ते हाळ गावात पळाले. त्याठिकाणीच खड्डयांजवळ उग्रवास आला असता पेंडा बाजूला केल्यानंतर गोमांस, व गोवंशीय प्राण्यांचे अवशेष आढळून आल्याने उपस्थित गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर रात्रगस्तीवरील पोलिस तत्काळ हाळ गावात गेले असता आक्रमक पवित्रात घेत हाळ गावातील एका समुदायातील महिला आणि 150 पेक्षा जास्त गावकर्यांनी एकत्र येवून, गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी बिअरच्या बाटल्या देखील फेकून मारल्या. आणि त्यानंतर लाठीकाठीने हल्ला केला. यावेळी दोन गोरक्षक जखमी झाले आहेत. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी तातडीने अतिरिक्त पोलीस फौज फाटा, शिघ्रकृती दल आणि दंगल नियंत्रण पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, हिंदू संघटना कार्यकर्ते, गोरक्षक आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यांनी गुरुवार (दि.13 मार्च) रोजी सकाळपासून खालापूर पोलिस ठाण्यासमोर ठिंय्या आंदोलन केले. गोवंशाची बेकायदा कत्तल करणारे तसेच गोरक्षकांसह पोलीसांवर दगडफेक करुन हल्ला करणार्या संबंधीतांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तणावाच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, रसायनी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी यावेळी संतप्त गोरक्षक आणि हिंदू संघटना कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत यातील 12 आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निवळली. खालापूर पोलीसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत.