नागोठणे : थंडीच्या दिवसात साधारण जानेवारी नंतर स्थानिक वाल व पावट्याच्या शेंगा शेतात तयार होण्यास सुरुवात होत असते. या वर्षीच्या शेंगा नुकत्याच नागोठणे बाजार पेठेत दाखल झाल्या असून चविष्ट अशा निडी गाव व परिसरातील शेंगांना त्यानंतर तयार होणाऱ्या कडवे वालांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. यामध्ये सुरुवातीलाच येणाऱ्या बांधावरच्या टपोरी शेंगा महाग असल्या तरीही ग्राहक त्या खरेदी करत आहेत.
नागोठणे येथील छ.शिवाजी महाराज चौकात सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत महिला विकायला आणलेल्या वाल व पावट्याच्या शेंगाची निडी व परिसरातील शेतकरी खाडीच्या किनारी असलेल्या आपल्या शेतात लागवड करतात. शेतात येणारे खारे व गोडे पाण्यामुळे शेंगांना वेगळीच चव लागत असल्याने निवडीप्रमाणे प्रामुख्याने नागोठण्याचे कडवे वाल जग प्रसिद्ध आहेत. थोड्या दिवसांपूर्वी बांधावरच्या शेंगा बाजारात येऊ लागल्या आहेत.
सुरुवातीला बांधावरच्या शेंगांनी भाव खात किलोला 200 रुपये दर मिळवून दिला. आता शेतातील शेंगा थोड्या फार प्रमाणात येत आहेत. जस जशी शेंगांची आवक वाढत जाते तस तसे भाव आवाक्यात म्हणजे 100 रुपयांच्या आसपास येत असतात. या हंगामात थंडी सुरू झाली की स्थानिकांना वेध लागतात ते पोपटीची, त्यासाठी शेंगा कितीही महाग असल्या तरीही विशिष्ट चवीमुळे ग्राहक त्या खरेदी करत असतात.स्थानिक गावटी शेंगा होण्या आधी पोपटीसाठी सहज उपलब्ध होणारी पर राज्यातून व घाट माथ्यावरून आलेल्या शेंगांची नाइजास्तव वापरत असतात. आता स्थानिक शेंगा मोठ्या प्रमाणात येत असल्याने नागोठणे परिसरात आकर्षित अशा पोपटीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. याचा आनंद घेण्यासाठी शहरातील नातेवाईक व मित्र परिवार आवर्जून येत असतात. याच शेंगा सुकल्यानंतर तयार होणारा वाल हा नागोठण्याचा कडवा वाल म्हणून जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कडव्या वालालाही मोठी प्रमाणात मागणी आहे.