रायगड जिल्ह्यातील 5 लाख 48 हजार 620 कुटुंबांपैकी 4 लाख 71 हजार 826 कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. file Photo
रायगड

Raigad | रायगड जिल्ह्यात 4 लाख 72 हजार कुटुंबांना नळ कनेक्शन

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील 5 लाख 48 हजार 620 कुटुंबांपैकी 4 लाख 71 हजार 826 कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. विशेष म्हणजे उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यातील 100 टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.

केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 86 टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत.

नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात येत आहे. योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता अपेक्षित आहे.

जलजीवन योजनेच्या माध्यमातून 15 तालुक्यांमध्ये एक हजार 496 योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत यामधील 613 योजनांची कामे पूर्ण झाली होती.

तीन तालुक्यांत 100 टक्के नळ कनेक्शन

जिल्ह्यातील उरण, म्हसळा, खालापूर तालुक्यांतील 100 टक्के कुटुंबांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे या तीन तालुक्यात जलजीवन मिशनच्या योजनांची कामे चांगल्या प्रकारे दिसून येत आहेत. तर पेण तालुक्यात जलजीवन मिशनची कामे सर्वात कमी झाली आहेत. उर्वरित तालुक्यात या योजनेची कामे 70 टक्क्यांच्या वर झालेली आहेत. पेण तालुका हा नेहमीच पाणी टंचाईत पुढे असतो. मार्चपासून या तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. शासनामार्फत टँकरने गाव-वाड्यांवर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पेण तालुक्याला जलजीवन योजनांची खर्‍या अर्थाने आवश्यकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT