Raigad accident 
रायगड

Raigad accident: ताम्हिणी घाटात अपघात, डोंगरावरून दगड थेट चालत्या कारवर; महिलेचा मृत्यू

Raigad Landslide Accident: पुणे माणगाव मार्गावरील कोंडेथर गावचे हद्दीतील ताम्हिणी घाटातील घटना

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: ताम्हिणी घाटातील माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावचे हद्दीतील दरडी परिसरात गुरुवारी (दि. ३० ऑक्टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दरडी परिसरातील दरडीतून सुटलेला मोठा दगड चालत्या कारवर कोसळल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

या घटनेत स्नेहल गोविंदास गुजराती (वय, ४३ वर्ष रा. पिंपरी चिंचवड, पुणे) असे असून या महिलेच्या डोक्यात दगड पडल्याने ती महिला जखमी होऊन बेशुद्ध झाली. तिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना तिने मृत्यूला कवटाळले. या घटनेची माहिती मिळताच माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोर तिचे नातेवाईक व गुजराती समाजाचे नागरिकांनी एकच धाव घेतली. ही महिला आपल्या पती व सासूसह माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील नातेवाईकांच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आपली कार क्रमांक एमएच १४ एमएल ७४७९ या कारने निघाल्या होत्या.

सदर कार तिचा पती चालवत होता, तर ती पतीच्या बाजूच्या सीटवर बसली होती. या कारला सनरूफ असल्याने त्यांची कार पुणे - माणगाव राज्य मार्गावरून जात असताना कोंडेथर गावाच्या हद्दीत असलेल्या दरडी परिसरातून जाताना अचानक वरून दगड कोसळला. तो दगड थेट कारच्या सनरूपवर पडला, त्यामुळे सनरूफ फुटून दगड महिलेच्या डोक्यावर आदळला. या धक्क्यात त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या. या घटनेनंतर तिच्या पतीने तत्काळ त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच महिलेचे नातेवाईक, ओळखीचे आणि समाजातील नागरिक मोठ्या संख्येने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जमले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील दरडीचे दगड ठिसूळ झाल्याची प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रवाशांनी ताम्हिणी घाट मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT