खारघर : सचिन जाधव
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येत आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपुल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. नितीन गडकरी यांनी या कामाचा उद्घाटन सोहळा केला होता त्याला तब्बल 1 वर्ष झाले आहे.
17 एप्रिलला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार असून या पूर्वी रस्ते जोडणीचे काम आता जलदगतीने सुरू झाले आहे. कळंबोली जंक्शनवर होत असणार्या वाहतूक कोंडीमधून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा पुढील 6 महिने बंद ठेवण्यात आला असून सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. खोदकाम करायला सुरवात केली असून सर्व यंत्रणा जलदगतीने कामाला लावली असल्याचे महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कळंबोली जंक्शन अपग्रेड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ते विकास महामंडळ नोडल एजन्सी असून याकरता केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून 770 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. यामुळे हे वाहतूक सिग्नल आणि ट्रॅफिक फ्री होणार आहे. त्यामुळे तासनतास वाहनांना अडकून पडावे लागणार नाही. क्रॉस कॉनफ्लेक्ट सुद्धा दूर होणार आहे.
परिणामी वेळ आणि इंधन वाचणार आहे. हे काम टीआयपीएल या कंपनीला मिळाले असून माती परीक्षणाचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. या व्यतिरिक्त कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सहा महिन्यांसाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल एक्झिट बंद करण्यात आली आहे. भूमिपुजनानंतर कामाला बराच उशीर झाला पण अखेर कामाला सुरवात झाली असून नवी मुंबईची स्वागतकमान असणार्या या कळंबोली जंक्शनचे रूपडे पालटणार आहे. याची डिझाईन पाहता होणारी ट्रॅफिक समस्येचा तिढा सुटणार आहे.
कळंबोली जंक्शन हे वाहतूककोंडी संपणारा विषय आहे. आज नागरिकांची होणारी गैरसोय कायमची संपली जाईल. सहा महिने नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.तिरुपती काकडे, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक विभाग, नवी मुंबई