Kharghar SIR Census Forms AI Photo
रायगड

Kharghar BLO Suspended: SIR गणना पत्रकांच्या झेरॉक्सप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, 5 BLO निलंबित

विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) मतदारांकडून भरून घेण्यात आलेल्या गणना पत्रकांच्या अनधिकृत झेरॉक्सबाबत तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Kharghar SIR Census Forms

विक्रम बाबर

पनवेल : खारघरमध्ये SIR गणना पत्रकांच्या (Enumeration Form) अनधिकृत झेरॉक्सचा प्रकार समोर आला आहे. तब्बल ३ हजार ४०४ गणना पत्रके आढळून आली आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी पाच बीएलओंना निलंबित केले आहे.

दरम्यान, गणना पत्रके झेरॉक्स काढण्यासाठी घेऊन जाणाऱ्या सूरज पाटील यांच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या संवेदनशील कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तक्रारीनंतर प्रशासनाची तातडीने चौकशी

विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) मतदारांकडून भरून घेण्यात आलेल्या गणना पत्रकांच्या अनधिकृत झेरॉक्सबाबत २७ ऑगस्ट रोजी निवडणूक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर पनवेलचे नायब तहसीलदार सुनील किसन जाधव यांना या प्रकरणाची शहानिशा करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचांच्या उपस्थितीत खारघर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांकडे जमा असलेल्या गणना पत्रकांची पाहणी केली. खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स दुकानात SIR गणना पत्रकांचे गठ्ठे आढळून आल्याची तक्रार करण्यात आली होती.

शिवसेना (उबाठा) पनवेल महानगरप्रमुख अॅड. समाधान काशीद यांनी याबाबत पोलिसांकडे पत्र देऊन गणना पत्रकांच्या अनधिकृत झेरॉक्स, चोरी आणि संभाव्य गैरवापराबाबत संशय व्यक्त केला होता.

३४०४ गणना पत्रके पोलिसांकडे जमा

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पोलिसांकडे जमा असलेली कागदपत्रे ही SIR अंतर्गत मतदारांनी भरलेली गणना पत्रके असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. या फॉर्मवर मतदारांचे रंगीत फोटो, संबंधित यादी भागातील बीएलओची स्वाक्षरी तसेच आवश्यक माहिती भरलेली असल्याचे निदर्शनास आले.

यादीभागनिहाय करण्यात आलेल्या मोजणीत तब्बल ३ हजार ४०४ गणना पत्रके आढळून आली. मोठ्या संख्येने फॉर्म असल्याने प्रत्येक पत्रकाची स्वतंत्र मोजणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध झाले नाही. त्यामुळे यादीभागानुसार आकडेवारी नोंदविण्यात आली.

ही सर्व गणना पत्रके पाच पिशव्यांमध्ये भरून एका गोणीत ठेवण्यात आली. पंच आणि अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेबल लावून गोणी सीलबंद करण्यात आली असून ती पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या लोगोची कापडी पिशवीही आढळली

तपासणीदरम्यान ‘Election Commission of India’ असा उल्लेख आणि निवडणूक आयोगाचा लोगो असलेली ‘Special Intensive Revision of Electoral Rolls’ अशी छपाई असलेली कापडी पिशवीही आढळून आली. या पिशवीवर १३८ आणि १४९ असे क्रमांक असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

सूरज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

गणना पत्रके झेरॉक्स काढण्यासाठी घेऊन जाणाऱ्या सूरज पाटील यांच्याविरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणना पत्रकांची अनधिकृत हाताळणी, त्याच्या छायांकित प्रती काढणे तसेच शासकीय दस्तऐवजांच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपांबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम ३१४ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम १२८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणना पत्रके झेरॉक्स दुकानापर्यंत कशी पोहोचली?

SIR गणना पत्रके झेरॉक्स दुकानापर्यंत नेमकी कशी पोहोचली, ती कोणी उपलब्ध करून दिली, त्याच्या किती छायांकित प्रती काढण्यात आल्या आणि या प्रतींचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दरम्यान, SIR प्रक्रियेत मतदारांकडून जमा होणाऱ्या गणना पत्रकांच्या हाताळणीत निष्काळजीपणा अथवा नियमभंग झाल्याचे निदर्शनास आल्याने पाच बीएलओंवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिली.

या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या संवेदनशील दस्तऐवजांची सुरक्षितता आणि मतदारांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस तपास आणि निवडणूक विभागाची अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर गणना पत्रके बाहेर कशी गेली आणि त्यासाठी नेमकी कोणाची जबाबदारी होती, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT