विन्हेरे (रायगड) : विराज पाटील
महाड तालुक्यातील जलसंपदा विभाग अंतर्गत येणार्या धरणांमध्ये मागील एक ते दीड दशकांपासून निर्माण झालेल्या गाळामुळे धरणातील पाणीसाठा मध्ये होणारी घट लक्षात घेऊन या धरणातील गाळ काढला जावा याबाबत स्थानिकांकडून करण्यात आलेल्या मागणीकडे संबंधित विभागाकडून कार्यवाही न झाल्याने ही कामे चालू वर्षी देखील रखडणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त होत आहेत.
या संदर्भात माणगाव येथील संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडे विचारणा केली असता त्यांनी धरण ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये येते त्यांच्याकडून जलसंपदा विभागाला या संदर्भात शासनाच्या असलेल्या जलशिवार योजना तसेच गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत कामे करण्याबाबतचे प्रस्ताव देणे अत्यावश्यक असल्याचे निदर्शनास आणले महाड मधील कोणत्याही ग्रामपंचायतीने या संदर्भात आज पावतो अधिकृतपणे याबाबत जलसंपदा विभागाकडे मागणी केली नसल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले आहे.
महाड तालुक्यात चालू वर्षी एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासूनच ग्रामीण भागातील विविध भागांमध्ये टँकर फिरू लागले आहेत या सर्व बाबींचा विचार करता जून मध्ये सुरू झालेल्या पावसानंतर जुलै च्या मध्यावधी काळातच महाड तालुक्यातील वरंध खिंडवाडी खैरे कुर्ला कोथुर्डे धरणातील पाणी ओसंडून वाहू लागल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासून नागरिक अनुभवत आहेत यामुळेच त्यानंतरच्या किमान दोन महिने च्या कालावधीमध्ये झालेले पाणी हे फुकट जात असल्याने नागरिकांनी या संदर्भात जागरूकता दाखवीत संबंधित विभागाकडे धरण क्षेत्रातील गाळ काढण्याबाबत अथवा अन्य पर्यायाने येथील जलाशयाचा साठा कायम राहावा याकरिता विशेष उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.