रघुजीराजे आंग्रे सरखेल यांच्या हिराकोट किल्ला परिसरातील "घेरिया" बंगल्यात शस्त्र पूजन करण्यात आले Pudhari
रायगड

Raigad News | सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी ३५० वर्षांपूर्वी सुरु केलेली शस्त्रपूजन परंपरा आजही अबाधित

रायगड पोलीस दलाची १२७ वर्षांची प्राचीन शस्त्रपूजन परंपरा कायम

पुढारी वृत्तसेवा

Raigad dussehra shastra puja 2025

जयंत धुळप

रायगड - ३५० वर्षांपूर्वी दस्तूरखुद्द सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी सुरु केलेली विजयादशमीच्या दिवशीची शस्त्रपुजनाची परंपरा त्यांचे  वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांनी आजही अबाधित ठेवली आहे. क्षत्रिय परंपरेमध्ये शस्त्रपूजनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच परंपरेत सातत्य ठेवत सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे विद्यमान वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांच्या हिराकोट किल्ला परिसरातील "घेरिया" बंगल्यात आज सकाळी पारंपरिक शस्त्र तसेच अश्वपूजन करण्यात आले.

आद्य सरखेल कान्होजीराजे यांची वैयक्तिक वापरातील "धोप", दांडपट्टे, तलवारी , गुर्ज, कट्यारी, भाले, जांबिये, परशू, गुप्त्या, ढाल, व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्गल आणि परवाना प्राप्त आधुनिक अग्निशस्त्रे यांचे सरखेल रघुजीराजे यांनी सपत्नीक पूजन केले. त्यांचे चिरंजीव आर्यमान, जयार्जुन आणि कन्या गायत्री या पूजनात सहभागी झाले. संध्याकाळी पंरपरेनुसार सिमोल्लंघन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील घेरीया येथे करण्यात आले असल्याचे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले.

रायगड पोलीस दलाची १२७ वर्षांची प्राचीन शस्त्रपुजन परंपरा

विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन करण्याची रायगड पोलीस दलातील परंपरा ब्रिटीश सरकारच्या काळात १८९८ मध्ये सुरु झाली. गेल्या १२७ वर्ष ही पंरपरा अखंडपणे सुरु असून यंदा रायगडच्या जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी रायगड पोलीस मुख्यालयातील पोलिस क्वार्टर गार्ड येथे ही शस्त्रपूजा करुन ही प्राचीन परंपरा अबाधीत राखली आहे.

रायगडचे पोलिस अधीक्षक म्हणून, दसरा प्रसंगी पोलिस क्वार्टर गार्ड येथे शस्त्रपूजा करताना मला अत्यंत अभिमान आणि समाधान वाटते, अशी भावना या निमित्ताने  जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केली. 

सामर्थ्य हे नेहमी धर्मनिष्ठतेच्या मार्गानेच वापरले पाहिजे

आंचल दलाल पुढे म्हणाल्या, आपली शस्त्रे ही केवळ कर्तव्य पार पाडण्याची साधने नसून, समाजाचे रक्षण, न्याय प्रस्थापित करणे आणि शांतता टिकवून ठेवण्याची आपली जबाबदारी यांची पवित्र प्रतीके आहेत. आज या शस्त्रांना वंदन करून आपण त्या नेहमी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कायद्याच्या मार्गदर्शनाखालीच वापरण्याची प्रतिज्ञा करीत आहोत. ही पूजा आपल्याला आपल्या परंपरेशी जोडते आणि नेहमीच लक्षात ठेवण्यास सांगते की, सामर्थ्य हे नेहमी धर्मनिष्ठतेच्या मार्गानेच वापरले पाहिजे. या दसऱ्याच्या निमित्ताने मी प्रार्थना करते की, असत्यावर सत्याचा, भीतीवर धैर्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय व्हावा, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस बांधवांना मी सलाम करते, जे कठीण परिस्थितीतही अथक परिश्रम करून नागरिकांचे रक्षण करतात. या सणामुळे आपल्या सेवेला नवी ऊर्जा, ऐक्य आणि प्रेरणा लाभो अशा शुभेच्छा त्यांनी अखेरीस दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT