रायगडच्या जीवनवाहिन्या गाळाच्या विळख्यात pudhari photo
रायगड

Raigad rivers silt issue : रायगडच्या जीवनवाहिन्या गाळाच्या विळख्यात

नैसर्गिक जलस्रोतात घट, नदी प्रदूषणातही वाढ; शेतीचे क्षेत्र 20 टक्क्यांनी घटले

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः अतुल गुळवणी

रायगड जिल्ह्यातील बारमाही वाहणार्‍या सावित्री, कुंडलिका, अंबा या नद्या जिल्ह्याच्या जीवनवाहिनी आहेत. मात्र डोंगरातून होणारी वाढती धूप आणि नैसर्गिक पाणी स्रोत कमी होण्याचे वाढते प्रमाण आणि रासायनिक पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात दिवसेंदिवस होत असलेली वाढ यामुळे या जीवनवाहिन्यांमधील पाणी दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी होत आहे. याचा परिणाम हा पारंपरिक शेतीवर होत आहे. रायगडमधील 20 टक्के शेती क्षेत्रही घटल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे.

रायगडला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. यामुळे सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहत असतात. दरवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सावित्री, गांधारी, काळ, कुंडलिका, अंबा, भोगावती, पाताळगंगा, उल्हास नद्यांना महापूर येतोच. याचा फटका रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, पाली, पेण, खोपोली, खालापूर, कर्जत आदी शहरांना बसतोच. 1989 मध्ये पाली तालुक्यातील जांभूळपाडा या गावाला पुराचा मोठा तडाखा सहन करावा लागला होता. याशिवाय सन 2005 मध्ये आलेल्या महापुराने महाड, पोलादपूर, रोहा, पाली आदी शहरे पाण्याखाली गेलेली होती.

रायगडातून वाहणार्‍या सर्व नद्या विविध खाड्यांच्या माध्यमातून अरबी समुद्राला मिळतात. यामुळे अनेकदा खाडीद्वारे मोठ्या उधाणाला समुद्राचे पाणी हे नदीपात्रात मिसळते. या पाण्याचा पूर्ण निचरा होत नाही. यासाठी ज्या ठिकाणी खाडीमुख आहे, तेथील गाळ काढणे आवश्यक आहे. हे खाडीमुख गाळमुक्त झाले तर पुराचा होणारा धोका आपोआपच कमी होईल.

रायगडातील नद्यांचा उगम

1) उल्हास ः उल्हास नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात होतो. उल्हास ही 122 किलोमीटर लांबीची नदी रायगड, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये वाहते आणि कल्याणजवळ खाडीला मिळते. उल्हास नदी वसईच्या खाडीत जाऊन मिळते. मात्र या नदीची नैसर्गिक पाणी साठवण क्षमता गेल्या 20 वर्षांत 10 टक्क्यांनी कमी झाली आहे.

2) पाताळगंगा ः पाताळगंगा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो. पाताळगंगा नदीचा प्रवाह सुमारे 40 किमी असा आहे. ही नदी खोपोलीमार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते. या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी वाहून जाते.

3) कुंडलिका : कुंडलिका नदी मुळशी जलाशयाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उगम पावून नैऋत्येकडे 13 किलोमीटर वाहत जाते. नंतर पश्चिमेकडे कोलाडपर्यंत 32 किलोमीटर वाहून वायव्येकडे वळते. पुढे 48 किलोमीटर वाहत जाऊन रेवदंड्याजवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीचीही क्षमता 15 टक्क्यांनी घटलेली आहे.

4) अंबा ः अंबा नदीचा उगम, खोपोली-खंडाळा रस्त्याच्या बाजूला, सह्याद्री पर्वतातील बोर घाट डोंगरांमध्ये झाला आहे. अंबा नदी प्रथम नैऋत्येकडे 23 किलोमीटर वाहत जाऊन नंतर वायव्येकडे वळते. ती नागोठण्याजवळ धरमतर खाडीस मिळते. अंबा नदीचे पात्र उथळ झाल्याने दरवर्षी नागोठणेसारख्या शहराला पुराचा फटका बसतो.

5) सावित्री : सावित्री नदी महाबळेश्वर येथून उगम पावणार्‍या पाच नद्यांपैकी एक आहे. बाणकोट गावातून थेट अरबी समुद्रात रायगड जिल्ह्यात जाते आणि शेवटी हरेहरेश्वर येथे अरबी समुद्राला मिळते. या नदीमध्येही पाणी साठवण क्षमता 20 टक्क्यांनी घटलेली आहे.

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण सुरू झाले आणि दळणवळणाच्या सुविधा वाढू लागल्या, तसतशा नद्या प्रदूषित होऊ लागल्या. गावांतील व शहरांतील कचरा या नद्यांमध्ये टाकला जाऊ लागला आणि त्यामुळे रायगड जिल्ह्याचे पर्यावरण बदलू लागले. प्रदूषणाच्या समस्या गंभीर होऊ लागल्या. या प्रदूषित पाण्यामुळे शेतीबरोबरच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे.
प्रा. समीर बुटाला, पर्यावरण तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT