सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: नांदगाव येथील भवानी पाखाडी येथे रहिवाशी जनार्दन चोरघे यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत चौदाव्या शतकातील राजा हंबीरराव यांचा दुर्मिळ शिलालेख सापडला आहे. या शिलालेखाचे वाचन मुरूडचे इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांनी केले.
चोरघे कुटुंबीयांच्या वाडीला जलसिंचन करण्यासाठी विहीर आहे. इ.स. 2000 च्या सुमारास विहिरीतील गाळ काढताना एक मोठी शिळा सापडली. ही शिळा विहिरीतून बाहेर काढून विहिरी लगतच ठेवण्यात आली.
कित्येक वर्ष दुर्लक्षित असलेल्या या शिळेवरील बरीच अक्षरे व ओळी मानवी हस्तक्षेपामुळे (जसे या शिळेचा वापर काही काळ धुणी धुण्यासाठी केला जात होता) नष्ट झाली . तरीही सदर शिळेचे अक्षांश व रेखांशनुसार स्थान 18.393747, 72.925571 आहे. शिळेची लांबी व रुंदी अनुक्रमे 56 इंच व 23 इंच असुन सदर शिळा सुस्थितीत आहे.
आजमितीस राजा हंबीररावाचे किमान 4 शिलालेख (देवनार - इअठउ मुंबई, रानवड - उरण, भिमेश्वर मंदिर नागाव, वाघ्रण ता.अलिबाग इ.) उपलब्ध असुन नांदगावचा हा शिलालेख हा हंबीररावाच्या संदर्भातील पाचवा शिलालेख आहे.
सदर शिळा ही गधेगळ प्रकारातील आहे. (गधेगळ - जर एखाद्याने राजाची आज्ञा मान्य केली नाही, तर त्याच्या कुटुंबातल्या महिलांचा गाढवाशी संभोग होईल असे दर्शविण्यासाठी शिळेवर गाढव व स्त्री यांचे संभोग शिल्प कोरलेले असते.) सदर शिळेचे तीन भागात विभाजन केले असता शिळेच्या वरच्या भागात चंद्र - सूर्य व मध्यभागी मंगल कलश अशा आकृत्या काढलेल्या आहेत. शिळेच्या मध्य भागात 23 ओळींचा लेख लिहिला असून अंत्य (खालील) भागात गाढव व स्त्रीचे संकरशिल्प कोरण्यात आले आहे. .
शिळेवर लिहिलेला लेख हा देवनागरी लिपीतील असून त्यात काही प्रमाणात फारसी भाषेतील शब्दांचा देखील वापर आहे. लेखाच्या पहिल्या ओळीत हिजरी सन 769 नमूद केले असुन त्यापुढे शके 1289, पळवंग संवत्सर नमूद आहे. म्हणजेच हा शिलालेख इसवी सन 1367 - 68 मध्ये कोरण्यात आला आहे