रायगड: कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाने अत्यंत संथ गतीने सुरुवात केली आहे. जून महिना अर्धा संपला तरी रायगड जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. १५ जून पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत अवघा २.६ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.
मागील वर्षी २०२५ मध्ये याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल ५३ टक्के पाऊस झाला होता, ज्याच्या तुलनेत यंदा पावसाने मोठी ओढ दिली असल्याचे स्पष्ट चित्र आहे. रायगड जिल्ह्याची जून महिन्याची सर्वसाधारण पावसाची सरासरी ३२७.९ मिमी आहे. मात्र, यंदा १५ जून दुपारपर्यंत जिल्ह्यात सरासरी केवळ ८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १५ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात सरासरी अवघा ०.१ मिमी पाऊस पडला.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद मुरुड तालुक्यात २६.४ मिमी (सरासरीच्या ८.९ टक्के) आणि म्हसळा तालुक्यात २५.१ मिमी (सरासरीच्या ६.४ टक्के) झाली आहे. १५ जून रोजी म्हसळ्यात २.० मिमी पावसाची नोंद झाली. पनवेल तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे अवघा १.३ मिमी (०.५ टक्के) पाऊस झाला आहे. तर पेण तालुक्यात २.५ मिमी (०.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. ही जिल्ह्यातील सर्वात निचांकी आकडेवारी आहे.
अलिबाग तालुक्यात ६.६ मिमी (२.३ टक्के) पाऊस झाला आहे. याशिवाय महाडमध्ये ११.२ मिमी (३.३ टक्के), रोह्यात १०.६ मिमी (३.० टक्के), पोलादपूरमध्ये १०.० मिमी (२.७ टक्के) आणि माणगाव तालुक्यात ८.६ मिमी (२.६ टक्के) पाऊस पडला आहे. श्रीवर्धन तालुक्यात १६.८ मिमी (४.६ टक्के) तर तळा तालुक्यात १६.६ मिमी (४.४ टक्के) पाऊस नोंदवला गेला आहे.
कर्जत तालुक्यात ३.१ मिमी (१.१ टक्के), खालापूर तालुक्यात ५.३ मिमी (१.८ टक्के), उरण तालुक्यात ५.८ मिमी (२.५ टक्के) आणि सुधागड तालुक्यात ४.० मिमी (१.१ टक्के) पावसाची नोंद झाली असून या सर्व भागांत पावसाची टक्केवारी २ टक्क्यांच्या आसपासच रेंगाळली आहे.