Raigad Rain Update
खाडीपट्टयात पहिल्याच पावसाने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  File Photo
रायगड

Raigad Rain Update | जिल्ह्यात संततधार : महाडमध्ये पूरजन्य परिस्थिती

पुढारी वृत्तसेवा

रायगड : गुरुवारी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी झाल्या. दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढला होता. रोहा आणि अलिबाग तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत होता. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण ९३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रोहा तालुक्यात (१३७ मि.मी.) झाला आहे. महाड-म्हाप्रळ येथे पाण्याची पातळी वाढली. यामुळे या परिसरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. वाहतूक व्यवस्थाही कोलमडून गेली.

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बुधवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. दक्षिण व किनारपट्टी तालुक्यांमध्ये पावसाचे अधिक प्रमाण आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात अलिबाग तालुक्यात ५४ मि.मी., पेण ५३, मुरुड ८०, पनवेल १०, उरण २४, कर्जत २३, खालापूर ४१, माणगाव २५, रोहा १३७, सुधागड १०८, तळा ४७, महाड ८६, पोलादपूर ७१, म्हसळा ६०, श्रीवर्धन ६१ आणि माथेरान ५२ असा एकूण ९३१ मि.मी. पावसाची दिवसभरात नोंद झाली आहे.

२ दिवस यलो अलर्ट

या पावसाने खरिपाच्या पिकांना चांगले पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी लावणीच्या कामांना वेग येणार आहे. हवामान विभागाने २८ जून, २९ जूनसाठी यलो अलर्ट तर ३० जून आणि १ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढतच राहणार आहे

पाण्याचा निचरा होण्यास अडथळा

महाड-म्हाप्रळ मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये संपूर्ण खाडीपट्टयाला वेटीस धरले असून ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे नाहक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पूर्वीच्या रस्त्यापेक्षा राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन रस्त्याचे काम उंच झाल्यामुळे तसेच चिभावे येथील नवीन पुलाच्या स्लॅबसाठी लावलेले जॅक न काढल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलाच्या वरील भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

SCROLL FOR NEXT